Ashok Saraf : महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांनी गेली अनेक वर्षे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सध्या ते त्यांच्या ‘अशी ही जमवा जमवी’ या सिनेमामुळे चर्चेत आहेत. या सिनेमात अशोक सराफ यांच्यासह वंदना गुप्ते मुख्य भूमिका साकारणार आहेत. तर, सुनील बर्वे सुद्धा या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

काही महिन्यांपूर्वी सुनील बर्वे यांनी आपल्या पत्नीसह अशोक व निवेदिता सराफ यांच्या घरी भेट दिली होती. तेव्हा अभिनेत्यांनी त्यांच्या घरातील एका खास गोष्टीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता आणि तो फोटो होता दारवरच्या नेमप्लेटचा. दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांच्या घराच्या दारावरची नेमप्लेट खूपच खास आहे. यावर नेमकं काय लिहिलंय पाहूयात…

अशोक सराफ यांच्या घराच्या नेमप्लेटचं मराठी चित्रपटसृष्टीतील आयकॉनिक ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटाशी खास कनेक्शन आहे. ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट २३ सप्टेंबर १९८८ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अफलातून कामगिरी केली होती. यामधील सगळे संवाद प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. “धनंजय माने इथेच राहतात का?” हा संवाद आजही घराघरांत लोकप्रिय आहे. या डायलॉगवरूनच त्यांनी दारावरची नेमप्लेट बनवून घेतली आहे.

“धनंजय माने इथेच राहतात…श्री. अशोक सराफ ( द वरजिनल हास्यसम्राट )” असा मजकूर त्यांच्या दारावरच्या नेमप्लेटवर लिहिण्यात आला आहे. हा फोटो काही महिन्यांपूर्वी सुनील बर्वे यांनी शेअर केला होता. “काल एकदा खात्रीच करून घेतली! ते नक्की इथेच रहातात!” असं कॅप्शन सुनील बर्वेंनी या फोटोला दिलं होतं.

अशोक सराफ यांच्या घराची नेमप्लेट पाहून नेटकरी प्रचंड खूश झाले होते. “पोस्ट पाहून पुन्हा चित्रपट पहायची इच्छा झाली”, “Funny नेमप्लेट”, “अशोक मामांचा नादच खुळा…”, “पुन्हा पुन्हा पाहावासा वाटणारा चित्रपट आहे”, “परफेक्ट नेमप्लेट” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या पोस्टवर केल्या होत्या.

दरम्यान, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धूमधडाका’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘आम्ही सातपुते’ ते नुकताच प्रदर्शित झालेला ‘वेड’ अशा असंख्य गाजलेल्या चित्रपटांमध्ये अशोक सराफ यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. मालिका असो, सिनेमा असो किंवा नाटक त्यांनी कायमच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.