मराठीतील काही लोकप्रिय चित्रपटांची नावं सांगायची झाल्यास त्या यादीत सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही बनवाबनवी’चं नाव नक्कीच असेल. हा मराठी सिनेसृष्टीतील प्रचंड लोकप्रिय चित्रपट आहे. २३ सप्टेंबर १९८८ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट ३५ वर्ष उलटूनही अजूनही घरोघरी पाहिला जातो. या चित्रपटावर आणि यातील गाण्यांवर आजच्या काळातही प्रेक्षक तितकंच प्रेम करतात.
या चित्रपटातील ‘हा माझा बायको पार्वती’, ‘७० रुपये वारले’, ‘धनंजय माने इथेच राहतात का?’ असे अनेक संवाद आजही प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, लक्ष्मीकांत बेर्डे, सिद्धार्थ रे, सुप्रिया पिळगांवकर, प्रिया बेर्डे, निवेदिता जोशी सराफ अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात होती. या सर्वांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या चित्रपटातील किस्से, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेल्या धमाल गोष्टी हे कलाकार अनेकदा सांगत असतात. ‘मी बहुरूपी’ या अशोक सराफांच्या पुस्तकात त्यांनी असाच एक किस्सा सांगितला आहे.
हेही वाचा… Bigg boss 17 मधील ‘या’ स्पर्धकावर रोहित शेट्टी झाला खूश; ‘खतरों के खिलाडी’ शोची दिली ऑफर
“‘अशी ही बनवाबनवी’ १९८८ मध्ये प्रदर्शित झाला आणि या सिनेमानं सगळे रेकॉर्ड तोडले. निर्माते किरण शांताराम होते. यातली भावखाऊ भूमिका खरं तर सचिन आणि लक्ष्याची होती. कारण त्यांना बाईच्या वेषात खूप धमाल करता आली. माझी सर्वात आवडती हिरोईन कोण? असा प्रश्न मला एका मुलाखतीत विचारला होता, त्यावेळी ‘अशी ही बनवाबनवी’ मधला सचिन असं उत्तर मी दिलं होतं. सचिन आणि लक्ष्या या दोघांनी खरंच त्या भूमिकांमध्ये उत्तम केल्या. लक्ष्याच्या आयुष्यातला हा सर्वात उत्कृष्ट परफॉर्मन्स होता असं माझं मत आहे. संधी असूनही त्याने कुठेही अतिरेक केला नव्हता. सचिननंही त्याला ते करूही दिलं नाही. सिनेमाचं शूटिंग चालू असताना आम्हाला धमाल येत होती, हा सिनेमा हिट होईल असं वाटलं होतं, पण तो इतकं मोठं यश मिळवेल, ३२ वर्षांचा रेकॉर्ड करेल अशी कल्पना नव्हती. निदान मला तरी वाटलं नव्हतं. सचिनच्या उत्तम सिनेमांमध्ये अशीही बनवाबनवी’ चा नंबर बराच वरचा आहे,” असं त्यांनी या पुस्तकात लिहिलंय.
अशोक सराफ यांनी त्यांच्या पुस्तकात अनेक किस्से सांगितले आहेत. इतकंच नाही तर बऱ्याच मुलाखतीतही ते जुन्या चित्रपटांमधील किस्से, प्रसंग सांगत असतात.