दिग्गज मराठी अभिनेते अशोक सराफ(Ashok Saraf) व ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते(Vandana Gupte) लवकरच एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लोकेश गुप्ते दिग्दर्शित ‘अशी ही जमवा जमवी’ या चित्रपटातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात अशोक सराफ व वंदना गुप्ते यांची जुगलबंदी पाहायला मिळणार असल्याचे या चित्रपटाच्या टिझरमध्ये पाहायला मिळाले. आता या चित्रपटाच्या निमित्ताने अशोक सराफ व वंदना गुप्ते यांनी नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी साठीनंतर प्रेम म्हणजे नक्की काय यावर त्यांनी वक्तव्य केले आहे.
प्रेम हे कायम…
अशोक सराफ व वंदना गुप्ते यांनी नुकतीच त्यांनी ‘नवशक्ती’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना विचारले की या वयात प्रेम म्हणजे तुमच्यासाठी काय आहे? यावर बोलताना अशोक सराफ म्हणाले, “प्रेम हे कायम राहतंच. पण आता एकत्र असणं महत्वाचं आहे. तुम्ही एकमेकांना किती साथ देता हे महत्वाचं आहे. साथ महत्वाची आहे आणि ती साथ तुम्ही कशी निभावता हे महत्वाचं आहे. उतारवयात एक वेगळीच स्टोरी बनते. या स्टेजवर एक वेगळं प्रेम होतं.”
वंदना गुप्ते म्हणाल्या, “आता या क्षणाला प्रेम म्हणजे कुटुंब आहे. प्रेमापेक्षा मैत्री आणि त्यातील निस्वार्थी प्रेम, त्यातून कोणाकडे काही अपेक्षा नाहीत. एकमेकांबरोबर वेळ व्यतीत करणे. आता सगळ्या जबाबदाऱ्यातून तुम्ही पार पडलेले असता. कुटुंब आपापली निर्माण झाली आहेत.
पुढे वंदना गुप्ते म्हणाल्या, “मला ७० व्या वर्षी अशी फिल्म करायला मिळते. प्रमुख भूमिका करायला मिळते हे केवढं मोठं भाग्य आहे. हे आमचं यश आहे. आम्ही काम करत राहिलो. मामांनी खूप काम केलेलं आहे. मी फार निवडक चित्रपटांत काम केलं. पण, या वयात हे करायला मिळणं आणि कदाचित असंही आपल्यामध्येही काहीतरी दडलेलं असेल. तर ते उघड करायला संधी मिळतेय. मैत्रीच्या पलीकडचं प्रेम असतं. साथ, सोबत असते. हा प्रेमाचा गोडवा आहे त्यात काही अपेक्षा नाहीत. तरूणपणाच्या प्रेमाची अपेक्षा फार वेगळी असते. पण आता त्या अपेक्षांच्या पलीकडे पलीकडे गेलेलं आहे.”
याबरोबरच, अशोक सराफ हे निर्मळ मनाचे आहेत. त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळतात, असेही वंदना गुप्ते यांनी म्हटले. ‘अशी ही जमवा जमवी’ हा चित्रपट १० एप्रिल २०२५ ला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटांबरोबरच अशोक सराफ हे सध्या कलर्स मराठी अशोक मा.मा. या मालिकेतूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे.