अशोक सराफ गेली अनेक दशकं आपल्या कामाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. आज त्यांचा ७६ वा वाढदिवस आहे. आतापर्यंत त्यांनी पन्नासच्या वर हिंदी चित्रपट, दोनशेच्या आसपास मराठी सिनेमे, पंधरा टीव्ही मालिका, पंचवीस नाटकं केली आहेत. त्यांना सर्वांकडून भरभरून प्रेम मिळतं. त्यांना सर्वजण प्रेमाने ‘मामा’ अशी हाक मारतात. त्यांना ‘मामा’ म्हणण्याची सुरुवात कशी झाली हे खुद्द अशोक सराफ यांनी काही वर्षांपूर्वी ‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये उघड केलं होतं.
ते म्हणाले होते, “कोल्हापूरकडे ‘मामा’ म्हणणं हे लोक खूप मानाचं समजतात. एका चित्रपटाचं तिथे शूटिंग करत असताना आमचा कॅमेरामॅन त्यांच्या छोट्या मुलीला एकदा सेटवर घेऊन आला आणि तिला म्हणाला, हे बघ…हे कोण? हे अशोक मामा. त्या लहान मुलीला मला मामा म्हणायला सांगताना तोच मला मामा म्हणू लागला.”
पुढे ते म्हणाले, “तिथे बाकी सगळे स्पॉट बॉईज आणि काम करणारी मंडळी होती त्यांना मला काय म्हणायचं हा प्रश्नच होता. साहेब म्हणणं त्यांना लांबच वाटत होतं आणि अशोक तर ते म्हणू शकत नव्हते. म्हणून मग त्यांनीही मला मामा म्हणायला सुरुवात केली. यानंतर मला इतके सगळे मामा म्हणून लागले की आता शूटिंग पाहायला आलेली लोकही मला मामा म्हणतात. लोक मला मामा म्हणतात याचं मला सुख जास्त वाटतं.”
दरम्यान, आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे जवळचे मित्रमंडळी, सिने सृष्टीतील कलाकार सोशल मीडियावरून त्यांना शुभेच्छा देत आहेत.