Ashok Saraf : पद्मश्री-महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांनी गेली अनेक दशकं रसिक प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. फक्त स्टार होणं सोपं असतं पण, स्टार झाल्यावर आपल्या चाहत्यांच्या मनात घर करणं हे फक्त अशोक सराफ यांच्यासारख्या महान कलाकारांनाच जमतं. आज वयाची पंचाहत्तरी ओलांडून सुद्धा अशोक सराफ टेलिव्हिजन, चित्रपट अशा सगळ्या माध्यमांमध्ये काम करत आहेत. त्यांचा फिटनेस, त्यांची एनर्जी आजच्या तरुणाईला लाजवेल अशीच आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ यांनी फिटनेसबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

अशोक सराफ ‘अमुक तमुक’ला दिलेल्या मुलाखतीत सांगतात, “आयुष्यात पॅशन खूप महत्त्वाचं असतं. नाटक करणं, सिनेमात काम करणं हेच माझं पॅशन आहे. जोपर्यंत मी अभिनय क्षेत्रात आहे तोपर्यंत मी कधीच थकणार नाही. आयुष्यात तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी करत असाल तर, तुम्ही कधीच थकणार नाही.”

अभिनेते पुढे म्हणाले, “याबद्दलचा एक अनुभव सांगतो, दिवंगत अभिनेते अशोक कुमार माझ्या खूप जवळचे होते, त्यांनी माझा ‘एक डाव भूताचा’ हा सिनेमा पाहिला होता आणि मला थेट मिठी मारली होती. त्यांनी बहुधा टीव्हीवर तो सिनेमा पाहिला असावा…पण, तेव्हापासून एक अभिनेता म्हणून त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. त्यांनी शेवटचे जे दोन मराठी सिनेमे केले ते माझ्यामुळे केले कारण, मी त्या दोन्ही सिनेमांमध्ये काम करत होतो. तेव्हा त्यांचं वय होतं ८४ वर्ष. याचा अर्थ त्यांचंही त्यांच्या कामावर किती प्रेम होतं हे आपल्याला समजतं. माझंही वय आता ७८ झालंय पण, कामाबद्दल मनात एक पॅशन आहे म्हणूनच मी आवडीने काम करतोय.”

कामावर प्रेम असणं महत्त्वाचं – अशोक सराफ

“आपल्या आवडीचं काम आपण चार दिवस जरी केलं नाही तरी आपण अस्वस्थ होतो. मी एवढी वर्ष माझ्या आवडीचं काम करतोय…त्यामुळेच मी आनंदी आहे.” असं अशोक सराफ यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फिटनेसबद्दल ‘लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजिटल अड्डा’ला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ म्हणाले होते, “तुम्ही जे काम करताय त्याच्या तुम्ही जवळ राहिलात ना…तर तो फिटनेस तुमच्यात आपोआप येतो. एकंदर काय तर तुमचं तुमच्या कामावर खरंच प्रेम असेल तर फिटनेससाठी वेगळं काहीच करायची गरज नसते.”