शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ २०२२ मध्ये दिग्दर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट चांगलाच गाजला होता. प्रवीण तरडे दिग्दर्शित या चित्रपटात आनंद दिघेंची भूमिका प्रसाद ओक यांनी निभावली आहे. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटाच्या सीक्वेलच्या ट्रेलरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिग्गज अभिनेते अशोक सराफ, गोविंदा, निवेदिता सराफ, सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर या ट्रेलर लाँचवेळी उपस्थित होते. यावेळी अभिनेता सलमान खाननेदेखील हजेरी लावली होती. सलमान खानने अशोक सराफ यांची गळाभेट घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

काय म्हणाले अशोक सराफ?

‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे २’ ट्रेलर लाँचवेळी अशोक सराफ यांनी भाषण केले. त्यावेळी त्यांनी म्हटले, “एका राजकीय क्षेत्रातील व्यक्तीवर अशा चित्रपटाची निर्मिती होऊ शकते, हे पहिल्यांदाच बघितलं. राजकारण व अभिनय दोन वेगळी टोकं असतानादेखील एक सुंदर चित्रपट बनू शकतो, हे आम्ही ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट आला तेव्हा आम्ही हे पाहिलेलं आहे आणि आता चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर पाहिल्यानंतर उत्सुकता वाढली आहे. आता यापुढे काय बघायला मिळणार हे निश्चित कळत नाही. हा चित्रपट वेगळी कथा दाखवेल, असं मला निश्चित वाटतं. हा सिनेमा बनविणाऱ्या लोकांचं कौतुक वाटतं.कारण- ते एका वेगळ्या विषयावर चित्रपट बनवतात आणि तो चित्रपट हिट होतो. चित्रपटाचा ट्रेलर बघता, ‘धर्मवीर‘चा हा दुसरा भागदेखील हिट व्हायला हरकत नाही. मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी या चित्रपटाचे दोन, तीन किंवा चार कितीही भाग बनवावेत. त्यांनी ते बनवले पाहिजेत आणि लोकांपर्यंत एका नेत्याचं जीवन कसं असतं, हे पोहोचवलं पाहिजे, ते दाखवलं पाहिजे, असं मला मनोमन वाटतं”, असे मत मांडत अशोक सराफ यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा: “जेव्हा अरमान व क्रितिका बिग बॉसमधून बाहेर येतील तेव्हा..”, पायल मलिक घेणार मोठा निर्णय

दरम्यान, ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे २’ चित्रपटाबद्दल बोलायचे, तर २०२२ मध्ये आलेल्या धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा पुढचा भाग आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले होते. आता या दुसऱ्या भागालादेखील तसाच प्रतिसाद मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok saraf said producer should make part 3 4 and so on during dharmveer part 2 trailer launch nsp