मराठी चित्रपटसृष्टीतील पद्मश्री व महाराष्ट्र भूषण पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) आणि अभिनेत्री वंदना गुप्ते या दोघांचाही एक मोठा चाहतावर्ग आहे. आजवर त्यांनी आपापल्या अनेक विविधांगी भूमिका आणि चित्रपटांतून स्वत:चा चाहतावर्ग तयार केला आहे. अशातच या दोघांच्या मुख्य भूमिका असलेला आणि खट्टी-मिठी प्रेमकथा असलेला चित्रपट येत असल्याने अनेक चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या दोघांना एकत्र आणणारा ‘अशी ही जमवा जमवी’ हा अभिनेता लोकेश गुप्ते दिग्दर्शित चित्रपट १० एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
त्यानिमित्ताने अशोक सराफ व वंदना गुप्ते या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. ‘अशी ही जमवा जमवी’च्या प्रमोशनचा अशोक सराफ यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अशोक सराफ यांना ‘प्रेमात किंवा कामात जमवाजमवी केली आहे का’ असा प्रश्न विचारण्यात आला आणि त्याचं उत्तर देताना अशोक सराफ यांनी अगदी भन्नाट उत्तर दिलं आहे. त्याशिवाय त्यांनी सुरुवातीच्या काळात कामात जमवाजमवी केल्याचीही प्रांजळ कबुली दिली आहे.
यावेळी अशोक सराफ यांनी उत्तर देताना म्हटलं, “प्रेमाची अशी जमवाजमवी मी कधी केली नाही. ती जमत नव्हती आणि आपण करीतही नव्हतो; पण कामाबद्दल मी अशी जमवाजमवी अनेकदा केली आहे. मी आधी ज्या ठिकाणी काम करीत होतो, त्या ठिकाणी कामावर दांड्या मारणे, दांड्या मारण्यासाठी बाकीच्या लोकांना सांगणे, जेणेकरून त्यांनी आपलं काम करावं. मी नाटक किंवा सिनेमांच्या शूटिंगला जाताना अनेकदा लोकांना सांगायचो. तू एक काम कर, तू दुसरं काम कर, असं सांगून मी जायचो. ही जी जमवाजमवी केली आहे, त्याशिवाय मी कोणतीही जमवाजमवी केलेली नाही. बाकी जमवाजमवी करण्याचा आपला स्वभावच नाही.”
‘अशी ही जमवा जमवी’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या ट्रेलरमधून अशोक सराफ व वंदना गुप्ते यांचा एक वेगळा आणि हटके अंदाज पाहायला मिळत आहे. थोडी खट्याळ, थोडी गोंडस व थोडी हळवी अशी या चित्रपटाची कथा असल्याचे या ट्रेलरमधून दिसले. तसेच आजच्या तरुणाईबरोबरच प्रौढांनाही भावणारा आणि नवीन विचार मांडणारा हा चित्रपट आहे.
दरम्यान, अशोक सराफ व वंदना गुप्ते यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘अशी ही जमवा जमवी’ हा चित्रपट १० एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात चैत्राली गुप्ते, सुनील बर्वे, मिलिंद फाटक, सुलेखा तळवलकर, पुष्कराज चिरपुटकर आणि नवोदित कलाकार तनिष्का विशे व ओमकार कुलकर्णी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.