९० च्या दशकातील मराठमोळ्या लोकप्रिय अभिनेत्री व लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया बेर्डे त्यांच्या परखड मतांमुळे नेहमी चर्चेत असतात. नाटक, चित्रपट, मालिका आणि राजकारण या क्षेत्रांमध्ये अधिक सक्रिय असणाऱ्या प्रिया बेर्डेंनी नुकताच ‘लोकमत फिल्मी’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अशोक सराफ यांच्याबरोबर असलेले घरचे संबंध आणि त्यांनी दिलेल्या कानमंत्राबाबत सांगितलं.

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांना विचारलं की, अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं? आणि तुम्ही त्यांना मामा म्हणतात. तर तुमचा हा घरोबा कसा झाला? यावर प्रिया बेर्डे म्हणाल्या, “‘ययाती आणि देवयानी’ हे गोपीनाथ सावकारांचं नाटक. गोपीनाथ सावकार हे अशोक मामांचे मामा. त्या नाटकामध्ये काम करण्यासाठी अशोक सराफ सतत यायचे. त्यावेळी माझे बाबा अरुण कर्नाटकी दिग्दर्शक होते. तर माझ्या बाबाकडे अशोक मामा नेहमी सांगायचे की, मला काम असेल तर बघा. मला खूप हौस आहे. कारण तेव्हा ते आंतरमहाविद्यालय स्पर्धा करत होते.”

पुढे प्रिया बेर्डे म्हणाल्या की, जेव्हा ‘पांडू हवालदार’ चित्रपटाचं कास्टिंग होत होतं, तेव्हा अशोक मामाचं कास्टिंग झालं. माझ्या वडिलांच्या माध्यमातून झालं. त्यावेळेला माझी आई त्याच्या बायकोच्या भूमिकेत होती. तेव्हा मी तीन चार वर्षांची असेल. मी अगदीत बाळ असल्यापासून त्याने मला अंगाखांद्यावर खेळवलं आहे. त्यामुळे तिथून तो घरोबा सुरू होतोय आणि आज इतक्यावर्षांपर्यंत आहे.

“मी आजवर अशोक मामाबरोबर सगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. त्याची मुलगी, प्रेयसी, बायको म्हणून मी काम केलंय. अशोक मामाबरोबर काम करणं म्हणजे खूप काही शिकण्यासारखं असतं. मी त्याला विचारलं होतं की, मला अभिनय करण्यासाठी काय करावं लागेल? मी जेव्हा नवीन होते तेव्हा मी हा प्रश्न विचारला होता. तेव्हा मला त्यानं सांगितलं होतं, प्रिया काय करायला पाहिजे याच्यापेक्षा, काय करू नये हे आधी तू शिक. म्हणजे ते तुला जास्त मदत करेल. अभिनय करताना काय करू नये समजल्यावर काय करायला पाहिजे हे समजतं. मला त्याने हा कानमंत्र, गुरुमंत्र दिला होता,” असं प्रिया बेर्डे म्हणाल्या.

तसंच पुढे प्रिया बेर्डे म्हणाल्या की, अशोक मामाला जो आता पद्मश्री जाहीर झाला आहे. याला थोडा उशीर झाला आहे. पण, ठीक आहे. त्याच्यामागच्या गोष्टी आपल्याला माहीत नाही. पण अशोक मामाला पद्मश्री मिळतोय याच्यात खूप आनंद आहे. त्यामुळे अशोक मामा तुझं खूप खूप अभिनंदन.

Story img Loader