मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ(Ashok Saraf) हे त्यांच्या एकापेक्षा एक चित्रपटासाठी आणि गाजलेल्या भूमिकांसाठी ओळखले जातात. ‘पांडू हवालदार’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘अबोध’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘घर घर की कहाणी’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘माँ बेटी’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘आम्ही सातुपते’, ‘वेड’, ‘साडे माडे ३’, ‘नवरा माझा नवसाचा’ अशा अनेक चित्रपटांतून अशोक सराफ यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्यांच्या विनोदाच्या टायमिंगसाठी ते ओळखले जातात. काही चित्रपटांत त्यांनी गंभीर भूमिकाही साकारल्या आहेत. आता अभिनेते एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘अशी ही जमवा जमवी’ असे या चित्रपटाचे नाव आहे.

‘अशी ही जमवा जमवी’ या चित्रपटाचा एक टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये सुरुवातीला सुनील बर्वे दिसत आहेत. ते पेपर वाचत असून टेबलवरील फोन वाजत असल्याचे ऐकायला येते. ते म्हणतात की आई फोन वाजतोय, तर वंदना गुप्ते कोण आहे विचारतात, तर सुनील बर्वे सांगतात की सुधा मावशी आहे. हे नाव ऐकताच वंदना गुप्ते यांच्या हातातील भांडी खाली पडतात. त्या फोन घेतात, तर अशोक सराफ त्यांच्याशी बोलत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे चित्रपटाची नेमकी गोष्ट काय हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत, लोकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित ‘अशी ही जमवा जमवी’ या चित्रपटात फक्त तरुणांचीच नाही तर वृद्ध मित्र मैत्रिणींचीसुद्धा एक धमाकेदार कहाणी अनुभवायला मिळणार आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला असून अशोक सराफ आणि वंदना गुप्ते या दोन दिग्गज कलाकारांची मजेदार जुगलबंदी पहायला मिळत आहे. थोडी खट्याळ, थोडी गोंडस, थोडी हळवी अशी चित्रपटाची कथा आहे. अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांच्याबरोबरच सिनेमात सुनील बर्वे, चैत्राली गुप्ते, मिलिंद फाटक, सुलेखा तळवलकर, पुष्कराज चिरपुटकर, ओमकार कुलकर्णी, तनिष्का विशे असे लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

‘अशी ही जमवा जमवी’ चित्रपट १० एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. आता अशोक सराफ यांची ही नवीन भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का, तसेच वंदना गुप्ते व अशोक सराफ यांची जोडी काय कमाल करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Story img Loader