अशोक सराफ हे मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटांतून, नाटकांतून विविध भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. कधी खळखळून हसावणाऱ्या तर कधी भावुक करणाऱ्या भूमिका त्यांनी साकारल्या. मराठीसह हिंदी चित्रपटांतही त्यांनी काम केलं. अशोक सराफ यांच्या योगदानासाठी त्यांना ३० जानेवारी रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यानंतर अनेक कलाकारांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे.
चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदेनीही अशोक सरांफाचे कौतूक करत त्यांचे अभिनंदन केले. आपल्या अधिकृत सोशल मीडियावर अशोक सराफ आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदीता सराफ यांच्यासह फोटो शेअर करत केदार शिंदे व्यक्त झाले. “#अशोकसराफ.. म्हणजे आपले अशोक मामा, यांना “महाराष्ट्र भूषण पुरस्कार” हा पुरस्कार काल जाहीर झाला. मराठी रसिकांची पोचपावती या निमित्ताने त्यांना मिळाली. कारण ते आहेतच महाराष्ट्र भूषण.. आमच्या पिढीला विनोद आणि त्यांचं टायमिंग खऱ्या अर्थाने त्यांनी शिकवलं. विनोद हा नैसर्गिक असतो त्याला कुणाचा अपमान न करता सादर कसं करावं? हे त्यांचे संस्कार. आज सकाळी घरी जाऊन त्यांचे आशिर्वाद घेतले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या,” अशी पोस्ट त्यांनी फोटो शेअर करत लिहिली.
हेही वाचा… अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याचा निर्घृण खून; कंगना रणौत पोस्ट शेअर करत म्हणाली…
अभिनेत्री प्राजक्ता माळीनेसुद्धा या पुरस्कारासाठी अशोक सराफांचं अभिनंदन केलं. “आपले अत्यंत लाडके, अत्यंत आदरणीय, अभिनयातले “भीष्म पितामह” “अशोक मामा”; आपणांस “महाराष्ट्र भूषण” पुरस्कारासाठी मनापासून आभाळभर शुभेच्छा. असेच आम्हांला उत्तमोत्तम काम करण्यासाठी प्रेरीत करत रहा… ” असे कॅप्शन देतं प्राजक्ताने अशोकमामांचा फोटो पोस्ट केला आहे.
हेही वाचा… आवडती अभिनेत्री कोण? विचारल्यावर अशोक सराफांनी घेतलेलं ‘या’ अभिनेत्याचं नाव, वाचा किस्सा
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून ही घोषणा केली. “ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा #महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले आहे,” असं त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं.