मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन विषयांवर आधारित वेगळ्या धाटणीच्या कथानकावर आधारित चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यामध्ये हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ पासून ‘इलू इलू १९९८’ या चित्रपटाचा समावेश आहे. आता यामध्ये आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. ‘आता थांबायचं नाय'(Ata Thambaycha Naay) असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांचे लाडके कलाकार पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेतून भेटीला येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आता थांबायचं नाय’ चित्रपट कधी प्रदर्शित होणार?

‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाचा एक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट शिक्षणावर आधारित असल्याचे सिनेमाच्या नावावरून तसेच टीझरमधून दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या झी गौरव पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहायला मिळाला होता. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्याचे म्हटले आहे. आता थांबायचं नाय चित्रपटाचे दिग्दर्शन शिवराज वायचाळ यांनी केले असून उमेश कुमार बन्सल , बवेश जानवलेकर, निधी परमार हिरानंदानी आणि धरम वालिया यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

सिद्धार्थ जाधव व भरत जाधव यांची पहिली झलक चित्रपटाच्या टीझरमध्ये दिसत आहे. टीझरमध्ये सर्वजण एका दिशेने पळत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. हातात कसलेतरी पान दिसत आहे. त्यामुळे चित्रपटाची गोष्ट नक्की काय असणार, चित्रपटात नेमके काय पाहायला मिळणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. कलाकारांबरोबरच संगीताने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

सिद्धार्थ जाधव व भरत जाधव यांच्याबरोबरच प्राजक्ता हनमगर, किरण खोजे, प्रवीण डाळिंबकर, ओम भुतकर, पर्ण पेठे आणि आशुतोष गोवारीकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. सिद्धार्थ जाधव व भरत जाधव यांनी याआधी काही चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्यांच्या कॉमेडीच्या अचूक टायमिंगने त्यांनी प्रेक्षकांना भरभरून हसवले आहे. ‘दे धक्का’ हा त्यांच्या गाजलेल्या चित्रपटापैकी आहे.आता पुन्हा एकदा ही लोकप्रिय जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

दरम्यान, आता थांबायचं नाय हा चित्रपट १ मे २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता सिद्धार्थ जाधव व भरत जाधव यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मन जिंकणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.