अभिनेता अतुल कुलकर्णी(Atul Kulkarni) हे त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जातात. फक्त मराठीच नाही, तर हिंदी व इतर अनेक भाषांतील चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. ‘नटरंग’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला मोठी लोकप्रियता मिळाल्याचे पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एका मुलाखतीत अलीकडे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत काम का केले नाही, यावर वक्तव्य केले होते. आता त्यांनी केलेली एक पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.

लोक चिरडले जातात, लोकांची प्रेतं बनतात…

अतुल कुलकर्णी यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक कविता शेअर केल्याचे दिसत आहे. ‘लोक-मताची डुबकी’ या मथळ्याखाली त्यांनी लिहिले, “मतं गर्दी करतात, मतं डुबकी घेतात. लोक चिरडले जातात, लोकांची प्रेतं बनतात, लोक रडतात-भेकतात, लोक शांत होतात. पाच वर्षं सरतात, १२ वर्ष सरतात. परत, मतं गर्दी करतात, मतं डुबकी घेतात. लोक चिरडले जातात, लोकांची प्रेतं बनतात, लोक रडतात-भेकतात, लोक शांत होतात. मतं मनोरे रचतात, मतं जल्लोष करतात. लोक कोसळून पडतात, लोक घायाळ होतात, लोक रडतात, लोक भेकतात, लोक शांत होतात, पाच वर्षं सरतात, बारा महिने सरतात, परत लोक मतं मनोरे रचतात, मतं जल्लोष करतात. लोक कोसळून पडतात, लोक घायाळ होतात, लोक रडतात भेकतात, लोक शांत होतात, परत…, मतं रक्त सांडतात, लोक शांत राहतात, लोक भक्त असतात, लोक मतं बनतात, मतं आंधळी होतात, लोक ठेचा खातात. मतं रक्त सांडतात, लोक शांत राहतात, परत…”, अशी कविता त्यांनी लिहिली आहे. त्यांची ही पोस्ट आतापर्यंत १३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिली असल्याचे दिसत आहे.

अतुल कुलकर्णी हे विविध विषयांवर व्यक्त होताना दिसतात. मतदानादरम्यान त्यांनी लिहिलेल्या एका कवितेने लक्ष वेधून घेतले होते. अतुल कुलकर्णी हे नेहमीच राजकीय मुद्द्यांवर ठाम व परखड भाष्य करताना दिसतात. मतदार म्हणून आपण कुठे चुकतो हे त्यांनी वेडी आशा या कवितेत मांडले होते.

दरम्यान, ‘हे राम’, ‘बम बम बोले’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘७०६’, ‘चांदनी बार’, ‘सिटी ऑफ ड्रीम्स’, ‘नटरंग’ अशा अनेक चित्रपट, वेब सीरिजमधून अतुल कुलकर्णींनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Story img Loader