Atul Parchure Passed Away : ‘जागो मोहन प्यारे’, ‘माझा होशील ना’, ‘होणार सून मी ह्या घरची’ अशा असंख्य गाजलेल्या मालिका, विविध नाटके आणि चित्रपटांमधून घराघरांत लोकप्रिय झालेले ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे काळाच्या पडद्याआड झाले आहेत. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अतुल परचुरे गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाने त्रस्त होते. या जीवघेण्या आजारावर त्यांनी यशस्वीपणे मात केली होती मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती पुन्हा ढासळली. ‘सूर्याची पिल्ले’ या नाटकातून अतुल परचुरे रंगभूमीवर झळकणार होते, नाटकाची तालीम सुद्धा पूर्ण झाली होती. पण, शुभारंभाच्या प्रयोगाला ५ दिवस बाकी राहिलेले असताना त्यांची प्रकृती खालावली. अतुल परचुरेंना डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे त्यांच्याऐवजी ‘सूर्याची पिल्ले’ या नाटकात सुनील बर्वे यांनी भूमिका साकारली आणि अतुल परचुरेंनी नाटकातून काही दिवसांसाठी ब्रेक घेतल्याचं जाहीर केलं होतं..

हेही वाचा : अतुल परचुरेंनी ‘या’ चित्रपटात साकारलेली अशोक सराफ यांच्या बालपणीची भूमिका; ज्येष्ठ अभिनेते आठवण सांगताना झाले भावुक

अखेर कलाविश्व गाजवणाऱ्या या ज्येष्ठ अभिनेत्याचं सोमवारी दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्या निधनाने संपूर्ण मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. सुप्रिया व सचिन पिळगांवकर, अशोक सराफ, प्रिया बापट, सुबोध भावे, सई ताम्हणकर, शरद पोंक्षे, शुभांगी गोखले यांसह अनेक मराठी कलाकारांनी पोस्ट शेअर करत अतुल परचुरेंना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर, “आम्हाला ‘पु.लं’बरोबर जोडणारा पूलच ढासळला” असं म्हणत कुशल बद्रिकेने अतुल परचुरेंच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

अतुल परचुरेंच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार

अतुल परचुरेंच्या पार्थिवावर आज ( मंगळवार १५ ऑक्टोबर ) सकाळी ११ वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Atul Parchure
अतुल परचुरे ( Atul Parchure )

हेही वाचा : Atul Parchure : “अतुल परचुरेंच्या चाहत्यांपैकी एक या नात्याने मी…”, एकनाथ शिंदेंची चतुरस्त्र अभिनेत्याला श्रद्धांजली

दरम्यान, अतुल परचुरे ( Atul Parchure ) यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘कापूसकोंड्याची गोष्ट’, ‘गेला माधव कुणीकडे’, ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘नातीगोती’, ‘व्यक्ती आणि वल्ली’ अशा अनेक मराठी नाटकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय छोट्या पडद्यावरच्या ‘जागो मोहन प्यारे’, ‘भागो मोहन प्यारे’, ‘अळी मिळी गुपचिळी’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘माझा होशील ना’ या त्यांच्या मालिका प्रचंड गाजल्या. मराठीसह अनेक हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.