Atul Parchure Passed Away : मराठीसह हिंदी कलाविश्व गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं १४ ऑक्टोबर रोजी निधन झालं. गेल्या काही वर्षांपासून ते कर्करोगाने त्रस्त होते. मात्र, या जीवघेण्या आजारावर मात करून त्यांनी ‘खरं खरं सांग’ या नाटकाद्वारे रंगभूमीवर कमबॅक केलं होतं. पुनरागमन केल्यावर त्यांनी पुन्हा एकदा नाटकासाठी दौरे करण्यास सुरुवात केली होती. पण, गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.
‘सूर्याची पिल्ले’ या नाटकाची संपूर्ण तालीम पूर्ण झाली आणि शुभारंभाच्या प्रयोगाला अवघे पाच दिवस बाकी राहिलेले असताना अतुल परचुरेंची तब्येत बिघडली. दीर्घ आजाराने १४ ऑक्टोबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेविश्वाचं सर्वात मोठं नुकसान झाल्याच्या भावना अनेक कलाकारांनी व्यक्त केल्या आहेत. नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या अतुल परचुरेंना सुरुवातीच्या काळात प्रचंड संघर्ष करावा लागला होता. याबद्दल त्यांनी स्वत: सुलेखा तळवलकरांच्या ‘दिल के करीब’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं होतं.
हेही वाचा : Atul Parchure : “आमचा अतुल गेला, एक उमदा नट आणि जवळचा मित्र..” राज ठाकरेंची भावनिक पोस्ट
अतुल परचुरे म्हणाले होते, “नातीगोती’ हे नाटक करताना काय करण्यापेक्षा, काय करायचं नाहीये ही गोष्ट ओळखायला मी शिकलो. ते माझं सुरुवातीचं नाटक होतं आणि एक अभिनेता म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी ते नाटक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. कारण, नाटकात करिअर करायचं हे माझं पहिल्यापासून ठरलं होतं. त्यावेळी मी माझ्या जवळपासच्या लोकांकडून काही गोष्टी ऐकल्या होत्या.”
“माझे ‘सो कॉल्ड’ हितचिंतक तेव्हा बोलायचे ,तू नाटकात करिअर करणार म्हणजे काय करणार, तू दिसायला असा…दिसणं हिरोसारखं नाही. उंची वगैरे काही नाही. तुला काय काम मिळणार…गड्याची-नोकराची कामं मिळतील. साइड रोल करत राहशील…यात तू कसं करिअर करणार? असं मला अनेकांनी सांगितलं होतं. नातेवाईकांना जेव्हा मी नाटकातील करिअरबद्दल सांगायचो तेव्हा त्यांच्या डोळ्यात मला अविश्वास स्पष्टपणे दिसायचा. मला काही लोकांनी बोलून दाखवलं…अनेकजण मागून बोलायचे, जे माझ्या नंतर कानावर आलं.”
“व्यक्तिमत्व नाही, हिरोसारखं दिसणं नाही, उंची नाही हा काय काम करणार? असं बोलणाऱ्या लोकांना मला सुरुवातीला सिद्ध करून दाखवायचं होतं. त्यामुळे ‘नातीगोती’ नाटकामुळे खूप गोष्टी बदलल्या. या नाटकामुळे मी काम करू शकतो हे खूप लोकांना समजलं.” असं अतुल परचुरेंनी सांगितलं होतं.