Atul Parchure : ‘जागो मोहन प्यारे’, ‘माझा होशील ना’ यांसारख्या मालिका असो, रंगभूमी ते रुपेरी पडदा गाजवणारे हरहुन्नरी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बालकलाकार म्हणून आपली कारकीर्द सुरू करणाऱ्या अतुल परचुरेंना लिव्हरचा ( यकृत ) कॅन्सर झाला होता. अखेर ही झुंज अपयशी ठरली आहे. आयुष्यात सगळं काही व्यवस्थित सुरू असताना त्यांना कर्करोगाचं निदान झालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठी कलाविश्वात अतुल परचुरे यांनी आपल्या चतुरस्त्र अभिनयाने सर्वांचं मन जिंकलं. मराठीतच नव्हे तर हिंदी मनोरंजनसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. सगळ्या गोष्टी उत्तम सुरू असतानाच त्यांना कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला सामोरं जावं लागलं होतं. परंतु, या कठीण प्रसंगावर मात करत ते अतिशय जिद्दीने पुन्हा एकदा काम करण्यासाठी सज्ज झाले. ‘खरं खरं सांग’ या नाटकाच्या निमित्ताने त्यांनी रंगभूमीवर पुनरागमन केलं होतं. हा सगळा प्रवास त्यांनी काही महिन्यांपूर्वी ‘मित्र म्हणे’ पॉडकास्टमध्ये सौमित्र पोटेंशी संवाद साधताना सांगितला होता.

हेही वाचा : Atul Parchure : “अतुल परचुरेंच्या चाहत्यांपैकी एक या नात्याने मी…”, एकनाथ शिंदेंची चतुरस्त्र अभिनेत्याला श्रद्धांजली

अतुल परचुरे लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाल्याने ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड येथे फिरायला गेले होते. सुरुवातीला ते एकदम फिट होते. मात्र, तिथून परतल्यावर त्यांना काहीच खाण्याची इच्छा होत नव्हती. त्यांना सतत मळमळल्यासारखं व्हायचं. यानंतर ते डॉक्टरकडे गेले, त्यांना अल्ट्रासोनोग्राफी करायला सांगितली होती आणि त्याचवेळी अतुल परचुरेंना त्यांच्या लिव्हरमध्ये ( यकृत ) ५ सेमीचा ट्यूमर असल्याचं सांगण्यात आलं.

अतुल परचुरे ( Atul Parchure ) हा कठीण काळ सांगताना म्हणाले होते, “चुकीच्या उपचारांमुळे सुरुवातीला तब्येत बिघडत गेली. मी रुग्णालयात दाखल झालो आणि पहिली प्रोसिजर झाली. मला काय झालं ते सांगता येत नाही, पण ती प्रोसिजर चुकली. त्याचे मेडिकल प्रुफ माझ्याकडे नाहीत. त्यातून मला पॅनिक्रिटायटिस झाला. मला चालता येत नव्हतं, बोलत असताना स्तब्ध व्हायचो. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी मला दीड महिना वाट पाहायला सांगितली. त्या डॉक्टरांनी सांगितलं होतं, लिव्हरमध्ये पाणी होईल, कावीळ होईल किंवा जीवंतही राहणार नाही. शेवटी मी डॉक्टर बदलले. या सगळ्या प्रवासात संजय नार्वेकर आणि विनय येडेकर हे मित्र सावलीसारखे माझ्याबरोबर होते.”

हेही वाचा : Atul Parchure Death : अभिनेता अतुल परचुरेचं निधन, पु.लंची शाबासकी मिळवणारा हरहुन्नरी कलाकार काळाच्या पडद्याआड

अतुल परचुरे ( Atul Parchure )

हळुहळू योग्य उपचार घेतल्यावर अतुल परचुरे या कठीण प्रसंगातून सावरले. त्यांनी दोन ते तीन डॉक्टरांचे सल्ले घेतले होते. कर्करोगावर मात करून काही महिन्यांपूर्वी त्यांनी ‘खरं खरं सांग’ नाटकातून रंगभूमीवर कमबॅक केलं होतं. याशिवाय ‘सूर्याची पिल्ले’ या नाटकात सुद्धा ते झळकणार होते. ‘सूर्याची पिल्ले’ नाटकाची सगळी तालीम झाल्यावर शुभारंभाला ५ दिवस बाकी राहिलेले असताना त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितल्याने सुरुवातीचे काही प्रयोग त्यांच्या ऐवजी सुनील बर्वे यांनी केले. पण, अखेर अतुल परचुरे ( Atul Parchure ) यांनी जगाचा निरोप घेतला असून एक हरहुन्नरी कलाकार मराठी सिनेसृष्टीने गमावला असल्याची भावना आज प्रत्येकाच्या मनात आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atul parchure passed away once ago actor talked about cancer treatment horrifying experience sva 00