जगभर प्रवास करून अनेक पुरस्कार विजेता आणि प्रेक्षकांची मनं जिंकणारा ‘स्थळ’ चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. सचिन पिळगांवकर प्रस्तुत आणि जयंत सोमलकर लिखित-दिग्दर्शित ‘स्थळ’ चित्रपटात अभिनेत्री नंदिनी चिकटे प्रमुख भूमिकेत झळकली आहे. नुकतंच या चित्रपटाच स्क्रीनिंग पार पडलं. या स्क्रीनिंगला अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. त्यामुळे सध्या कलाकार सोशल मीडियाद्वारे ‘स्थळ’ चित्रपटाचं भरभरून कौतुक करताना दिसत आहेत.

लोकप्रिय गायक अवधूत गुप्तेने नुकतीच सोशल मीडियावर ‘स्थळ’ चित्रपटासाठी खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टच्यामाध्यमातून अवधूतने चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं आहे. ‘स्थळ’ चित्रपटातील कलाकारांबरोबर फोटो शेअर करत अवधूत गुप्तेने लिहिलं, “स्वतःचा बाजार मांडण्यासाठी कुठल्याही स्त्रीला ज्या स्थळी खेचून नेले तरी जायचे नसावे…त्यामुळेच कदाचित प्रत्येक चांगले ‘स्थळ’ कायम चालून येत असावे! आपला देश हा जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनत असताना, मोबाईल क्रांतीनंतर आपण आता ‘कुठच्या कुठे‘ गेलो आहोत अशा गैरसमजात असलेल्या माझ्यासारख्या प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारा चित्रपट, दिग्दर्शक जयंत दिगंबर सोमाळकर यांनी बनवला आहे, ज्याचं नाव आहे ‘स्थळ’. ७ मार्चला प्रदर्शित झालेला हा चित्रपट आमचे गुरु सचिन पिळगांवकर यांनी प्रस्तुत केला आहे. त्याच्या स्क्रीनिंगनिमित्ताने तो पाहण्याचे भाग्य मला लाभले.”

पुढे अवधूत गुप्तेने लिहिलं, “या चित्रपटातील एकाही अभिनेत्याने ‘कॅमेरा’ नावाची गोष्ट याआधी आयुष्यात पाहिलेली नाही आणि अभिनय नावाची गोष्ट कशी असते हे त्यांना कोणी शिकवलेलेही नाही. चित्रपटात पल्लेदार संवाद नाहीत, की घडवून आणलेले कुठले प्रसंग देखील नाहीत. परंतु, तरी देखील या चित्रपटातील व्यक्तिरेखा आणि भौगोलिक चित्रीकरण तुम्हाला अशा प्रकारे कवेत घेते की, विदर्भातली थंडी तुमच्या त्वचेला जाणवते. तिथला कापूस तुमच्या नखात अडकतो. तिथली भाषा तुमच्या जिभेवर रेंगाळते. अगदी त्या माणसांचा उच्छ्वास तुमच्या श्वासात तुम्हाला जाणवतो.”

“मी काही चित्रपट समीक्षक नव्हे. त्यामुळे चित्रपटाचे कथाबीज वगैरे तुम्हाला सांगण्याची जबाबदारी माझ्यावर नाही. मी फक्त एवढेच सांगेन, की मॅकडोनाल्ड्सचा बर्गर आणि डोमिनोजचा पिझ्झा यांनाच ‘चविष्ट‘ मानणाऱ्या आपल्या जिभेला, खऱ्या रानातल्या करवंदांची चव आणि मोहाच्या फुलांचा वास आता बसल्या जागी मिळाला तरी कळणार नाही. आपण या गोष्टींपासून इतके दूर आलो आहोत की या गोष्टींचा आस्वाद घेण्यासाठी आपल्याला कष्ट घ्यावे लागतील. ‘हे चांगलं आहे’ असं आपल्या ज्ञानेंद्रियांना शिकवावं लागेल. ‘स्थळ‘ चित्रपट पाहणं हा देखील याच प्रक्रियेतील एक भाग आहे,” असं अवधूतने लिहिलं आहे.

“थोडक्यात..’घेण्यासारखं खूप आहे’ म्हणून अजिबात नव्हे. ‘गरीब बिचाऱ्या मराठी चित्रपटाला सपोर्ट करायला हवा’ म्हणून देखील नव्हे. ‘सामाजिक भान म्हणून’ वगैरे सुद्धा नव्हे..तर, नशिबात ‘गुलाब’ लिहिला असला तरीही, आपण शेवटच्या दोन अक्षरांपर्यंत पोहोचण्याचे कष्टच न घेतल्यामुळे आपल्या पदरी नक्की काय पडलं? याची जाणीव करून घेण्यासाठी पाहायलाच हवा…’स्थळ’,” अशा प्रकारे अवधूत गुप्ते ‘स्थळ’ चित्रपट पाहण्याचे आवाहन चाहत्यांना केलं आहे.

Story img Loader