मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक, संगीत दिग्दर्शक, दिग्दर्शक, निर्माता अशी अवधूत गुप्तेची ओळख आहे. आपल्या अनोख्या व अप्रतिम गाण्यांमुळे त्याने मराठी सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. अवधूत गुप्तेने बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना पक्षासाठी गीत लिहिलं होतं. त्याने राजकारणात यायची घोषणाही केली होती, पण पक्षाचं नाव जाहीर केलं नव्हतं. अशातच आता तो नक्की कोणत्या पक्षात आहे, याबाबत त्याला एका मुलाखतीत विचारण्यात आलं, त्यावर अवधूत नक्की काय म्हणाला, जाणून घेऊयात.
“तुझा आणि करीना कपूरचा संबंध काय?” अभिनेत्रीचा ‘ढोबळी’ उल्लेख करत अवधूत गुप्ते म्हणाला, “ती माझ्या…”
कोणत्या राजकीय पक्षात आहेस? असं विचारल्यावर अवधूतने त्याचं उत्तर दिलं. “खरं तर आम्ही कलाकार म्हटल्यानंतर आम्हाला कोणताही पक्ष नाही, असं म्हटलं जातं. पण आम्ही काय वेडे आहोत का? आम्ही काय आंधळे आहोत का? आम्हाला दिसत नाही, ऐकायला येत नाही का? आम्हाला सगळं दिसतं. आमच्या मनामध्ये एक पक्ष असतो, फक्त आमच्या कामामुळे तो पक्ष आम्हाला लोकांसमोर आणून ठेवता येत नाही. आम्ही कुठल्यातरी पक्षाचे असतोच, पण ते आम्ही जाहीरपणे सांगू शकत नाही,” असं अवधूत गुप्ते ‘मराठी किडा’शी बोलताना म्हणाला.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अवधूत गुप्तेने राजकारणात येण्याची मोठी घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी कोणत्या पक्षात जाणार याबद्दल काहीही भाष्य केले नव्हते. काही दिवसांपूर्वी त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. त्यात त्याने आयुष्यात राजकीय पक्षांशी आलेल्या संबंधांबद्दल सांगितलं होतं. “माझ्या कामाच्या निमित्तानं अनेक राजकीय पक्षांशी माझे संबंध आले. माझं ‘ऐका दाजिबा’ हे गाणं सुपरहिट झाल्यानंतर एकदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला भेटायला बोलावलं. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा जबरदस्त करिष्मा होता. त्यांच्याकडे गेल्यावर हरखून जायला व्हायचं. त्यावेळी मी २२-२३ वर्षांचा होतो. अनेकदा ते मला गप्पा मारायला बोलावायचे. आमच्यात तेव्हा ऋणानुबंध निर्माण झाले. शिवसेना पक्षासाठी मी अनेक गाणी केली. जवळपास दहा वर्षं मी शिवसेनेची कामं करत होतो,” अशी आठवण त्याने सांगितली होती.