Badlapur Sexual Assault Case : बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर सर्व स्तरातून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. या घटनेमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट पाहायला मिळत आहे. या प्रकरणी २० ऑगस्टला बदलापूरमधील नागरिकांनी मोठं आंदोलन केलं. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी सर्व नागरिक रस्त्यावर उतरले. रेलरोको आंदोलन केलं. यावेळी पोलिसांमध्ये व नागरिकांमध्ये बाचाबाची झाली. परिस्थिती हाता बाहेर गेल्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज, अश्रूधुराचा वापर करावा लागला. बदलापूरमध्ये घडलेल्या प्रकरणावर मराठी कलाकार देखील भडकले आहे. सोशल मीडियावर मराठी कलाकारांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
अभिनेत्री तेजस्विनी पंडितने ( Tejaswini Pandit ) इन्स्टाग्राम स्टोरीवर बदलापूर प्रकरणासंदर्भात ( Badlapur Sexual Assault Case ) पोस्ट लिहिली आहे. तेजस्विनीने लिहिलं आहे की, बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार करणाऱ्याला जातपात, धर्म नसतो…फक्त वृत्ती असते आणि तिच ठेचली पाहिजे. ज्यासाठी जाच बसणं गरजेचं आहे. नुसते कायदे कडक असून चालत नाही, ते आपल्याकडे आहेतच…अंमलात कधी आणायचे?..आणि सगळ्यांना एक मनापासून विनंती, कृपया बलात्कारासारख्या घृणास्पद कृत्याचं कुठल्याही पद्धतीने राजकारण करू नये. #निषेध #lawandordernotinplace
तसंच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ( Sonalee Kulkarni ) देखील सोशल मीडियाद्वारे बदलापूर प्रकरणाचा ( Badlapur Sexual Assault Case ) निषेध नोंदवला आहे. सोनालीने लिहिलं आहे, “पुरे झालं आता, आता वेळ आली आहे…’बदला’ ‘पूर'” तेजस्विनी पंडित आणि सोनाली कुलकर्णीच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
दरम्यान, बदलापूर प्रकरणावर ( Badlapur Sexual Assault Case ) अभिनेता रितेश देशमुख, प्रसाद ओक, शिवाली परब, प्रिया बापट, सुरभी भावे, रसिका सुनिल, अभिजीत केळकर, किरण माने, अक्षय केळकर, मृण्मयी देशपांडे अशा अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर लिहित निषेध नोंदवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात जे जे दोषी असतील त्या सर्वांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.