एक नाही, दोन नाही, तीन नाही तर चक्क ६ बायकांबरोबर प्रेमाचा हा नेमका गोंधळ काय आहे? याचा उलगडा येत्या जुलै महिन्यात चित्रपटगृहात करण्यात येणार आहे. ‘बाई गं’ चित्रपटाचं पहिलं गाणं ‘जंतर मंतर बाई गं’ हे नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
प्रत्येक यशस्वी पुरूषामागे स्त्रीचा हात असतो. पण, जेव्हा एक नाही चक्क सहा बायका एखाद्या पुरुषाच्या पाठिशी असतील तेव्हा त्या पुरुषाची अवस्था काय होत असेल? हे येत्या १२ जुलैला ‘बाई गं’ या चित्रपटातून आपल्याला कळेल. या चित्रपटाची एक छोटीशी झलक “जंतर मंतर” या पहिल्या गाण्यातून पाहायला मिळत आहे.
अभिनेता स्वप्नील जोशी या गाण्यात प्रत्येक वेगवेगळ्या वयोगटातील हरहुन्नरी सहा अभिनेत्रींबरोबर आपला जलवा दाखवताना दिसतोय. सुकन्या मोने, प्रार्थना बेहेरे,अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान या सहा अभिनेत्रींची ‘जंतर मंतर’ या गाण्यावर चांगलीच जुगलबंदी रंगली आहे. ‘मितवा’नंतर स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहेरे यांची जोडी ‘बाई गं’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. त्यामुळे स्वप्नील प्रार्थनाचा चाहतावर्ग सध्या ‘बाई गं’ चित्रपटासाठी चांगलाच उत्सुक आहे.
अवधुत गुप्ते, कविता राम, मुग्धा कऱ्हाडे, शरायू दाते, श्वेता दांडेकर, सुसमिराता दावलकर, संचिता मोरजकर यांनी “जंतर मंतर” गाण्याला आपला आवाज दिला आहे. तर, वरूण लिखाते यांचं संगीत या गाण्याला लाभलं आहे. गाण्याचे बोल मंदार चोळकरने लिहिले आहेत. नुकतंच हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
या चित्रपटाचे संवाद, कथा, पटकथा पांडुरंग कुष्णा जाधव आणि विपुल देशमुख यांची आहे. याशिवाय याचं संकलन निलेश गावंड यांनी केलं आहे. चित्रपटाचं छायांकन नागराज एमडी दिवाकर यांचं आहे. एक अभिनेता आणि तब्बल ६ अभिनेत्री ही संकल्पनाच प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारी आहे. १२ जुलैला ‘बाई गं’ हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच स्वप्नील जोशीची निर्मिती असलेला ‘नाच गं घुमा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यामुळे आता ‘बाई गं’ चित्रपटाकडून सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहेत.