प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, पण जेव्हा एक नाही चक्क सहा बायका एखाद्या पुरुषाच्या पाठीशी असतील तेव्हा त्या पुरुषाची अवस्था काय होत असेल? सहा बायकांबरोबर संसार करण्याचा अनुभव कसा असू शकेल? प्रत्येक स्त्रीच्या मनातील इच्छा पूर्ण होतील का? यांसारख्या अनेक प्रश्नांचा उलगडा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बाई गं’ या चित्रपटातून होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्त्रीच्या इच्छा आणि त्यांच्या सन्मानाची गोष्ट मांडणारा पांडुरंग जाधव दिग्दर्शित ‘बाई गं’ हा चित्रपट १२ जुलै रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेता स्वप्निल जोशीसह, सुकन्या मोने, प्रार्थना बेहेरे, अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान आणि सागर कारंडे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक पांडुरंग जाधव, अभिनेता स्वप्निल जोशी, अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने, प्रार्थना बेहेरे, आदिती सारंगधर आणि दीप्ती देवी यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला भेट देऊन संवाद साधला.

या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक पांडुरंग जाधव म्हणाले, ‘माणसाचे कर्म नेहमी त्याच्याबरोबर असते, चांगल्या कर्माचे फळ नेहमी चांगले मिळते तर वाईट कर्म केल्यास त्याची शिक्षादेखील मिळते. ‘बाई गं’ हा चित्रपट याच संकल्पनेवर आधारित आहे. या चित्रपटातील नायकाला त्याच्या मागील जन्मांचे कर्म या जन्मात भोगावे लागते. ते नक्की काय आणि त्यावर चित्रपटातील नायक कसा तोडगा काढतो? हे या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे’.

हेही वाचा >>> एकापेक्षा अधिकचा भन्नाट विषय; आगामी ‘एक दोन तीन चार’ या चित्रपटातील कलावंतांचा ‘लोकसत्ता’शी संवाद

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत स्त्रीप्रधान चित्रपटांची लाट आली आहे. ‘बाई गं’ हा चित्रपटदेखील स्त्रीप्रधान आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना ‘बाई गं’ हा चित्रपट नवरा- बायकोच्या नात्यावर आधारित आहे. त्यामुळे हा चित्रपट फक्त स्त्रीप्रधान चित्रपट नाही, असे उत्तर स्वप्निल जोशी यांनी दिले. ‘बाईपण भारी देवा’, ‘झिम्मा’, ‘नाच गं घुमा’ हे चित्रपट स्त्रीप्रधान असले तरी त्या चित्रपटात वेगवेगळ्या नात्यांवर भर देण्यात आला होता. ‘बाईपण भारी देवा’ हा बहिणींच्या नात्यावर आधारित चित्रपट आहे, ‘नाच गं घुमा’ हा मालकीण आणि मोलकरीण यांच्यावर आधारित चित्रपट आहे. तर, ‘झिम्मा’ हा एका सहलीला निघालेल्या अनोळखी बायकांचा चित्रपट आहे. त्यामुळे हे चित्रपट स्त्रीप्रधान असले तरी नातेसंबंधांवर भाष्य करणारे आहेत. ‘बाई गं’ या चित्रपटातही सहा बायका आहेत, पण हा चित्रपट नवरा- बायकोच्या नात्यावर आधारित आहे. या सहा नायिकांची वेगवेगळी कथा या चित्रपटात पाहायला मिळते आणि त्या सगळ्या कथा एका पुरुषाशी जोडलेल्या आहेत, असेही स्वप्निल यांनी सांगितले.

स्वप्निल जोशीचे कौतुक करताना या चित्रपटातील सहा नायिकांपैकी एक असलेल्या अभिनेत्री प्रार्थना बेहरेने या चित्रपटासाठी स्वप्निल हाच योग्य नट होता, असे सांगितले. स्वप्निलला आजपर्यंत आपण एकाच चित्रपटात दोन नायिकांबरोबर काम करताना पाहिलेलं आहे. तो उत्तमरीत्या अशा चित्रपटात नायकाची जबाबदारी पेलू शकतो. आमच्या मैत्रीला दहा वर्षे झाली असली तरी, आजही मला त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळते, असे प्रार्थनाने सांगितले.

‘मी आणि स्वप्निलने ९ वर्षांपूर्वी एका मालिकेत काम केले होते. त्यानंतर या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकत्र काम केले आहे. स्वप्निल मला मराठीतला शाहरुख खान वाटतो. कोणत्या वेळी कोणती प्रतिक्रिया द्यावी हे त्याच्याकडून शिकायला मिळाले’ असे मत अभिनेत्री आदिती सारंगधर हिने व्यक्त केले. तर या चित्रपटात स्वप्निलबरोबर पहिल्यांदाच वेगळी भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुकन्या मोने कुलकर्णी यांनी त्याच्याबरोबर काम करताना उलगडत गेलेल्या त्याच्या स्वभावाविषयी सांगितले. ‘आम्ही एक मालिका केली होती, त्यात स्वप्निल माझा जावई होता. त्यानंतर तो एका डान्स शोचा निर्माता होता. मग आम्ही या चित्रपटासाठी काम केले. या चित्रपटादरम्यान जाणवले हा कितीही मोठा झाला तरी त्याचे पाय जमिनीवर आहेत, अशा शब्दांत सुकन्या यांनी स्वप्निलचे कौतुक केले. तर ‘वाळवी’ चित्रपट पाहिल्यापासून स्वप्निलबरोबर काम करायची इच्छा होती, ती या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण झाली, असे अभिनेत्री दीप्ती देवी हिने सांगितले.

‘कलाकारांनी निर्मात्यांचा विचार केला पाहिजे’

मराठी चित्रपटसृष्टीत आशयघन चित्रपटांच्या निर्मितीचे प्रमाण वाढण्यासाठी नवीन निर्मात्यांना घडवण्याची गरज असल्याचे मत सुकन्या मोने- कुलकर्णी यांनी व्यक्त केले. निर्माते आपली जमापुंजी लावून चित्रपट तयार करतात, सेकंदा-सेकंदाला त्यांचा एकेक रुपया खर्च होत असतो, त्यामुळे त्यांचा एकही पैसा वाया जाणार नाही, याची दक्षता प्रत्येक कलाकाराने घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. चित्रपट निर्मितीची प्रक्रिया केवळ कलाकारालाच नव्हे तर निर्मात्यालाही घडवत असते. पहिल्या चित्रपटाचा चांगला अनुभव मिळाला तर निर्माता पुढच्या चित्रपटाचा विचार करू शकेल, त्यामुळे कलाकारांनी निर्मात्यांचाही विचार केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. मराठीमध्ये खूप सुंदर कथाविषय आहेत, उत्तम लेखक आहेत, पण त्यांना योग्य दाद मिळालेली नाही. त्यामुळे नवीन निर्माते घडवण्यासाठी कलाकारांनी पाठिंबा दिला तर साहजिकच नव्या लेखकांनाही संधी मिळेल. प्रेक्षकांनाही नवनवीन आशयाचे चित्रपट पाहायला मिळतील आणि तरच मराठी चित्रपटाचे सुगीचे दिवस वाढत जातील, असे मत सुकन्या मोने-कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bai ga movie team in loksatta digital adda zws