केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने यंदा मराठी बॉक्स ऑफिस खऱ्या अर्थाने गाजवलं. हा चित्रपट यंदाच्या वर्षात सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला आहे. ‘बाईपण भारी देवा’ला प्रेक्षकांनी दिलेल्या पसंतीमुळे वर्षाखेरीस या चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आलं होतं. यावेळी ‘बाईपण भारी देवा’ची संपूर्ण टीम उपस्थित होती. या कार्यक्रमात चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारलेल्या अभिनेत्रींनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
सुकन्या मोने म्हणाल्या, “या चित्रपटामुळे मला प्रचंड प्रेम मिळालं. रिलीजनंतर सर्वत्र माझ्या नावाची चर्चा सुरू होती आणि हे सगळं प्रेम आज माझी ९० वर्षांची आई स्वत:च्या डोळ्यांनी पाहतेय यापेक्षा दुसरा आनंद काय असू शकतो. मला ऑस्कर मिळावा अशी तिची मनापासून इच्छा आहे. पण, हे कसं शक्य आहे? या चित्रपटाच्या निमित्ताने आज मी तिला सांगू शकते हे प्रेम ऑस्करसारखंच आहे.”
“प्रेक्षकांचं हे प्रेम पाहण्यासाठी आज ती या सोहळ्याला उपस्थित आहे. याचा मला जास्त आनंद होतोय. तुम्हा सर्वांचे मन:पूर्वक आभार आमच्यावर व येणाऱ्या प्रत्येक मराठी चित्रपटावर असंच प्रेम करत राहा. आपले सगळे मराठी चित्रपट ६-६ महिने चालूदे…एवढीच इच्छा व्यक्त करते.” असं सुकन्या मोने यांनी सांगितलं.
दरम्यान, ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचं कथानक सहा बायकांच्या आयुष्यावर बेतलेलं आहे. यामध्ये सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, दीपा चौधरी आणि सुचित्रा बांदेकर या अभिनेत्रींच्या मुख्य भूमिका आहेत. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने एकून ७५ कोटींहून अधिक कमाई केली आहे.