Baipan Bhari Deva Film : ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. सहा महिलांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाने अवघ्या १० दिवसांमध्ये २६ कोटींचा गल्ला जमावला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले असून सहायक दिग्दर्शिका म्हणून त्यांची लेक सना शिंदेने संपूर्ण जबाबदारी सांभाळली होती. सनाने चित्रपटाच्या सेटवर सर्वांना कसे सहकार्य केले, याविषयी चित्रपटाच्या कलाकारांनी ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
हेही वाचा : लेकीच्या जन्मानंतर आलिया भट्टने कसं कमी केलं वजन? व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “बरोबर ६ आठवड्यांनी…”
‘बाईपण भारी देवा’मधील सहा मुख्य अभिनेत्रींची वेशभूषा, त्यांच्या मंगळागौर खेळतानाच्या साड्या, स्क्रिप्ट, जेवण अशी सर्व कामे सनाने अगदी उत्तम पार पाडली. तिच्याविषयी सांगताना सुकन्या मोने म्हणाल्या, “सना एकदम हुशार आणि शांत मुलगी आहे. तिला तिच्या जबाबदारीची पूर्णपणे जाणीव होती. तिने कधीच मी दिग्दर्शकाची मुलगी आहे असे वर्तन सेटवर केले नाही. खरेतर आम्ही सगळ्या तिच्या मावश्या होतो, असे असूनही ती आमच्याबरोबर कधीच जेवायला बसली नाही. तिला तिच्या प्रत्येक मर्यादा माहिती होत्या. सेटवर ती सहायक दिग्दर्शक म्हणूनच वावरत होती, मी माझ्या टीमबरोबर जेवते असे आम्हाला सांगायची.”
हेही वाचा : कतरिना कैफसह २० वर्षे काम करणारी ‘ती’ व्यक्ती कोण? पोस्ट शेअर करत म्हणाली, “माझ्यासाठी ते अनेकदा रडले…”
सनाविषयी सांगताना वंदना गुप्ते म्हणाल्या, “सना तिच्या कामात एवढी परफेक्ट होती की, आम्हाला चुका काढायला तिने जागा ठेवली नव्हती. सेटवर तिसऱ्या दिवशी मी मुद्दाम तिची फिरकी घेतली होती, जेवताना तिला यातील माझे ताट कोणते असे मी विचारले. यावर ती थोडी आश्चर्यचकीत झाली, मी तिला पुन्हा म्हणाले ताटावर माझे नाव नाही.” यानंतर ती अगदी मला घाबरून म्हणाली, ‘आम्ही फक्त कपड्यांवर नावं लावली होती…जेवणावर नाही.”
हेही वाचा : धनुषबरोबर १८ वर्षांचा संसार मोडल्यावर ऐश्वर्या रजनीकांत करणार दुसरं लग्न?
पुढे केदार शिंदे म्हणाले, सेटवर मी कधी तिला ओरडलो, तर या सगळ्याजणी मिळून मला उलट ओरडायच्या. हे ऐकल्यावर शिल्पा नवलकर म्हणाल्या, “कारण एवढी मदत करणारी सहायक दिग्दर्शिका खरंच कोणाला मिळत नाही.”
शिल्पा नवलकरांनी पुढे सांगितले, “दिग्दर्शकाची मुलगी म्हणून सनाला सेटवर अजिबात सूट नव्हती. व्हॅनिटीमधून आम्हाला घेऊन सेटवर जायचे ही मोठी जबाबदारी तिच्यावर होती. मुळात तिच्या डोक्यात विचारांचा गुंता नाही आहे. ती एकदम सरळ विचार करत असल्याने तिच्या डोक्यात कधीच कोणता गोंधळ नसतो.”