‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचे सध्या सर्वत्र कौतुक सुरु आहे. केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६५ कोटींचा गल्ला जमावला आहे. चित्रपटातील मुख्य ६ अभिनेत्रींनी त्यांच्या सहज, सुंदर अभिनयाने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. महाराष्ट्रातील प्रेक्षकवर्ग अभिनेत्रींबरोबरच दिग्दर्शक केदार शिंदे यांचेही प्रचंड कौतुक करत आहे. त्यांच्यासाठी एका चाहतीने खास पत्र लिहिले आहे.
‘बाईपण भारी देवा’ चित्रपट पाहिल्यावर एका चाहतीने केदार शिंदे यांचे पत्र लिहून कौतुक केले आहे. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाचा उल्लेख या पत्रात करण्यात आलेला आहे. “तुमची मेहनत, तुमच्या कामावर असणारा तुमचा विश्वास आणि परमेश्वरावर असणारी तुमची श्रद्धा ही चित्रपट पाहत असताना दिसून येते” असे पत्रात नमूद करत या चाहतीने त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा : प्राजक्ता माळीने लोकप्रिय अभिनेत्रीला भेट दिला खास दागिना; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “मला तुझ्या मनातलं…”
केदार शिंदेंनी या पत्रावर कमेंट करत, “मनापासून धन्यवाद…खूप काही लिहिले आहे. मी नेहमीच एकच जाणतो. जे जे करी कार्य माझ्या मताने. पुष्पापरी मी अर्पितसे सुखाने. स्वामी कृपेने उत्तम होवो ” असे म्हटले आहे.
दरम्यान, ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट ३० जूनला प्रदर्शित झाला होता. प्रदर्शित होऊन २६ दिवस झाल्यावरही या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. यामध्ये अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, सुकन्या मोने, वंदना गुप्ते, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब-चौधरी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.