गायिका सावनी रविंद्र ही मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या गायिकांपैकी एक आहे. आतापर्यंत तिने अनेक उत्तमोत्तम गाणी गायली. तर सध्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात तिने गायलेल्या गाण्यांसाठी तिचं खूप कौतुक होत आहे. तर आता तिला मंगळागौरीच्या ऑफर्सही येऊ लागल्या आहेत असा खुलासा करत तिने एक गमतीशीर किस्सा सांगितला आहे.
सावनी रविंद्रने या चित्रपटासाठी गायलेलं मंगळागौर हे गाणं गायलं आहे. हे गाणं तुफान हिट होत आहे. हे गाणं यूट्यूबवरही ट्रेंड होत आहे. या गाण्यानंतर सावनीला मंगळागौरीची गाणी गाण्यासाठी विचारणा होऊ लागली आहे.
याबद्दलचा गमतीशीर किस्सा शेअर करत ती म्हणाली, “माझ्या नवऱ्याला एकदा सकाळी ८ वाजता एका आजोबांचा फोन आला. माझा नवरा आशिष त्यांना म्हणाला की, हा सावनीचा नंबर नाही. मी तिचा नवरा बोलतोय. त्यावर ते आजोबा म्हणाले की, तुम्ही तिला एक विचाराल का? माझ्या सुनेची मंगळागौर आहे पुढच्या आठवड्यात. तर सावनी गाणी म्हणायला येऊ शकेल का? त्यावर आशिष ब्लॅंक झाला. त्यामुळे आता असं सगळं झालं आहे.”
हेही वाचा : Video: ‘बाईपण भारी देवा’ने एका आठवड्यात कमावले १२.५० कोटी, टीमने केलं खास सेलिब्रेशन
सावनीचं हे बोलणं आता चांगलंच चर्चेत आलं आहे. पण सर्वांना आपलं गाणं आवडत असून त्याला इतका चांगला प्रतिसाद मिळत असल्याने सावनीचा आनंद गगनात मावत नाहीये.