केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटाने अवघ्या १० दिवसांत २६ कोटींचा गल्ला जमावला आहे. ‘बाईपण भारी देवा’च्या घवघवीत यशानंतर चित्रपटातील मुख्य अभिनेत्रींनी अलीकडेच एका मुलाखतीला हजेरी लावली होती. यावेळी वंदना गुप्तेंनी त्यांच्या बालपणीच्या काही आठवणी सांगत, त्यांच्या आईने पैसे साठवून पहिले घर घेण्यात कसा हातभार लावला याबाबत खुलासा केला आहे.
‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट स्त्रियांच्या जीवनावर आधारलेला आहे. त्यामुळे लहानपणी तुमच्या आईकडून तुम्ही कसे व्यवहारज्ञान आत्मसात केले? असा प्रश्न ‘लेट्अप मराठी’च्या मुलाखतीत वंदना गुप्ते यांना विचारण्यात आला. यावेळी त्या म्हणाल्या, “माझी आई गाण्याचे कार्यक्रम करायची. त्यामधून तिला जास्तीत जास्त हजार ते २ हजार रुपये मानधन मिळायचे. अर्थात, ती रक्कम फार जास्त नव्हती. पण, त्यातून माझी आई शंभर, दोनशे रुपये बाजूला काढून साठवायची.”
हेही वाचा : “माझी माणसं…”, ‘बिग बॉस’ विजेता अक्षय केळकर गेला पावसाळी ट्रेकला, व्हिडीओत दिसली ‘या’ अभिनेत्रीची झलक
वंदना गुप्तेंनी पुढे सांगितले, “या शंभर रुपयांच्या नोटा माझी आई प्रत्येक साडीच्या घडीत ठेवून द्यायची. हेच पैसे नंतर एकत्र गोळा करून जवळपास १० ते १२ हजार जमले होते. या पैशांतून तेव्हा आम्ही नवे घर घेतले. तिथे माझे आणि माझ्या भावंडांचे बालपण गेले. अर्थात तेव्हा १२ हजार रुपये खूप जास्त होते. तो काळ खूप वेगळा होता. पण, माझ्या आईचे यासाठी खरंच कौतुक आहे कारण, साड्यांच्या घड्यांमध्ये पैसे साठवलेले असतील याचा अंदाज कोणालाच येणार नाही.”
हेही वाचा : “उपाशी झोपलो, लोकांचे अपशब्द ऐकले अन्…”, प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याने सांगितला संघर्षमय प्रवास
माझ्या आईचे हेच गुण माझ्यातही आले असल्याचे यावेळी वंदना गुप्तेंनी स्पष्ट केले. तसेच अभिनेत्री शिल्पा नवलकर, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर यांनीही व्यवहारज्ञान, पैशांचे योग्य नियोजन आईमुळे कळाले असे सांगतिले. दरम्यान, सध्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून सर्वत्र या अभिनेत्रींचे कौतुक करण्यात येत आहे.