‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. या चित्रपटात शेवटी दाखवण्यात आलेले मंगळागौर गाणं हिट ठरलं आहे. आता या गाण्याचा एक खास किस्सा समोर आला आहे.
‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील सर्वच गाणी सोशल मीडियावर हिट झाली आहेत. याच चित्रपटात शेवटी असणाऱ्या ‘मंगळागौर’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच गाजताना दिसत आहे. यातील अभिनेत्रींचा लूक, साड्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आता चित्रपटाच्या निर्मात्या माधुरी भोसले यांनी या गाण्याची एक खास कहाणी सांगितली आहे.
आणखी वाचा : प्रत्येकीला वेगळा रंग, ब्लाऊजवर विशिष्ट संदेश अन्…; ‘बाईपण भारी देवा’मधील ‘मंगळागौर’ गाण्यासाठी वापरलेल्या साड्यांची ‘ही’ आहे खासियत
या चित्रपटाच्या निर्मात्या माधुरी भोसले यांनी नुकतंच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी या गाण्याच्यावेळी काय अडचणी उद्भवल्या आणि हे गाणं कसं शूट झालं, याबद्दल खुलासा केला आहे. “या चित्रपटाला ४-५ निर्मात्यांनी नकार दिला होता. मला विशेष वाटलं की बाईपण सारख्या प्रॉजेक्टला कोण कसं नकार देऊ शकत. मी मात्र फारच खात्रीशीर होते कि बाईपण यशस्वी होणारच. मी खात्रीशीर असण्यामागे बरीच कारणेही होती. गोष्ट तर होतीच. त्याबरोबर केदारची दूरदृष्टी, त्याची स्पष्टता, उत्कटता हेही होतं त्यामुळेच मी हा चित्रपट करायचं ठरवलं. इथून हा प्रवास सुरू झाला जो फारच रंजक होता. तेवढाच हसता खेळता, तेवढाच कठीण आणि तेवढाच शिकवणारा”, असे माधुरी भोसले यांनी सांगितले.
“हा चित्रपट सहा ते सात महिन्यात पूर्ण होईल असे वाटतं होते. पण यासाठी जवळ जवळ साडेतीन वर्ष गेली. हा काळ वाढण्याची कारणेही तशीच होती. १ फेब्रुवारी २०२० ला बाईपण भारी देवा चित्रपटाचे शूट सुरु झालं. सर्व व्यवस्थित चाललं होतं. पण शेवटच्या दृश्याच्या वेळी मात्र अडचण आली. या चित्रपटात शेवटचा जो मंगळागौर स्पर्धेचा सीन होता त्याच शूट २१ मार्चला प्लॅन केलं होतं आणि १७ मार्चला लॉकडाऊन लागलं.
करोना वेगाने पसरत चालला होता, म्हणून आम्ही त्यावेळी ते शूट परिस्थिती नीट झाल्यानंतर करुया, असे ठरवले. त्यात दोन-तीन वाईट गोष्टी घडल्या. अजितचे बाबा गेले, माझे बाबा गेले. एकंदरीत वातावरणच असं होतं की काहीच स्पष्टता येत नव्हती कि पुढे काय होईल”, असेही त्यांनी म्हटले.
आणखी वाचा : “तुम्ही ब्राह्मण असूनही मांसाहार करता?” चाहतीच्या कमेंटवर सुकन्या मोने म्हणाल्या, “ते चांगलं की वाईट…”
“त्यानंतर सप्टेंबरमध्ये शूट करायला थोडा स्कोप होता म्हणजे शूटला परवानगी होती पण लिमिटेड टीम आणि अजूनही काही बंधन होती. शूटिंगला ५० पेक्षा जास्त लोक नकोत वगैरे. या क्लायमॅक्सच्या सीनला जवळजवळ २०० कलाकार हवे होते. आता आमचा कर्मचारी वर्गच ३५ जणांचा होता. तर एक मोठे चॅलेंज होतं की हे कसं जुळवायचं. शूटिंग तर करायचं होतं आणि कॉम्प्रोमाइजही करायचं नव्हतं.
मग केदारने खूप विचार करुन यावर एक उपाय काढला. आपण हा सीन फिल्म सिटीमध्ये इंडोर शूट करूयात का? मग आम्ही त्यावर व्यवस्थित विचार केला आणि ठरवलं की, या सहा बायका ज्या स्पर्धा जिंकल्या आहेत, त्यांचं जिंकणं एका कवितेने समराईज करुया. त्यासाठी केदारने एवढी सुंदर कविता करून घेतली की ते पाहिल्यावर वाटलं अरे हाच तर चित्रपटाचा शेवट आहे”, असे माधुरी भोसलेंनी सांगितले.