३० जून २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. सहा बहिणींच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाला रसिक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. खास करून महिला प्रेक्षकवर्गाचा या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड ब्रेक करत ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट ‘सैराट’नंतरचा मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चित्रपट हा कथा, कलाकारांचा अभिनय आणि दिग्दर्शनावर अवलंबून असतो. या तिन्ही गोष्टींची सांगड उत्तमरित्या झाली की चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘बाईपण भारी देवा’ आहे. या चित्रपटात अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, दीपा परब, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर या सहाजणींनी साकारलेल्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच घर निर्माण केलं. आजही ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट ओटीटीवर तितक्याच आवडीने पाहिला जात आहे. आज या चित्रपटाला प्रदर्शित होऊन एक वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने दिग्दर्शक केदार शिंदेंनी खास पोस्ट लिहिली आहे.

हेही वाचा – स्वप्नपूर्ती! ‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेने मुंबईत घेतलं हक्काचं घर, वास्तुशांतीचे फोटो व्हायरल

केदार शिंदे यांनी ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचा पोस्टर शेअर करत लिहिलं आहे, “याच दिवशी…मागच्या वर्षी…एक आयुष्यात घटना घडली. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. माझ्या पाठीशी ६ दणदणीत ब्लॉकबस्टर बायका होत्या. ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाने मला खूप काही दिलं. द्रव्य रूपात नाही. पण महाराष्ट्रातील तमाम स्त्रीयांच्या मनात एक महत्त्वाची जागा नक्कीच मिळाली. आज वर्ष झालं तरी कौतुकाचा वर्षाव कमी झाला नाही.”

“‘सैराट’नंतरचा गल्ला या सिनेमाने कमावला. मी नेहमीच म्हणतो, एक बाई जर घर चालवते, तर ती नक्कीच सिनेमा चालवू शकते. जबाबदारीची जाणीव आहे. यानंतर जे जे करेन ते ते या सिनेमाच्या तुलनेत प्रेक्षक पाहणार. धुंदीत राहून काम करणार नाही. पुन्हा शुन्यापासून सुरुवात केली आहे. मला खात्री आहे मायबाप प्रेक्षक पुन्हा पाठीशी उभे राहतील. स्वामींसारखेच!”, असं केदार शिंदेंनी लिहिलं आहे.

हेही वाचा – Video: “विराटने किंग कोहली का आहे हे दाखवलं”, सलील कुलकर्णींची टीम इंडियाला शाबासकी, म्हणाले, “पंड्या, बुमराह जादूगार…”

दरम्यान, केदार शिंदेंची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. चाहत्यांनी प्रतिक्रियेद्वारे शुभेच्छा दिल्या असून चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची मागणी देखील केली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baipan bhari deva movie complete one year kedar shinde shares special post pps