केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट ३० जूनला प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन तीन आठवडे पूर्ण झाले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. तसेच या चित्रपटाने अनेक रेकॉर्डही ब्रेक केले आहेत. आता केदार शिंदेंनी हा चित्रपट नाकारणाऱ्या दिग्दर्शकाबद्दलचा खुलासा केला आहे.
‘बाईपण भारी देवा’ च्या संपूर्ण टीमने नुकतंच चित्रपटाच्या यशाचे जंगी सेलिब्रेशन केले. यावेळी या चित्रपटातील सर्वच कलाकार उपस्थित होते. यावेळी एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा चित्रपट नाकारलेल्या निर्मात्याबद्दल खुलासा केला.
आणखी वाचा : “केसांचा लाल रंग, A अक्षराचे मंगळसूत्र अन्…”, ‘बाईपण भारी देवा’मधील सुचित्रा बांदेकरांच्या लूकची खासियत
“बाईपण भारी देवा हा चित्रपट हिट झाल्यानंतर मला एका निर्मात्याने मेसेज केला. त्याने माझे अभिनंदन केले. त्यावर मी त्याला मेसेज करुन सांगितलं, हाच तो चित्रपट आहे, जो मी तुझ्याकडे घेऊन आलो होतो. त्यानंतर तो व्यक्ती म्हणाला, माझी बस चुकली. पण मी आशा करतो की, आपण लवकरच एकत्र काम करु”, असा किस्सा केदार शिंदेंनी सांगितला.
“त्यामुळे एखाद्या निर्मात्याने चित्रपट नाकारला म्हणून मी मुद्दाम त्याच्याबरोबर काम करणार नाही, असं काही मी ठरवलेलं नाही. त्या निर्मात्याला तो चित्रपट योग्य वाटला नाही. पण मला या चित्रपटाची पहिल्या दिवसापासूनच खात्री होती. त्यामुळेच माझ्या आयुष्यात अजित भुरे आले. मी अजित दादाबरोबर एकदा बोलल्यानंतर ते दोन सेकंदात चित्रपटासाठी हो म्हणाले”, असेही केदार शिंदेंनी सांगितले.
दरम्यान ‘बाईपण भारी देवा’ हा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरला आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत.