दिग्दर्शक केदार शिंदे यांचा ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. त्या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ते प्रेक्षकांसाठी एका वेगळ्या विषयावरील कौटुंबिक चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाचं नाव ‘बाईपण भारी देवा’ असं आहे. आज या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
काही महिन्यांपूर्वीच केदार शिंदे यांनी त्यांच्या या आगामी ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची घोषणा केली होती. तेव्हापासूनच या चित्रपटाच्या हटके नावामुळे या चित्रपटाबद्दल सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. हा चित्रपट म्हणजे सहा बहिणींची गोष्ट आहे. महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाबरोबरच केदार शिंदे यांनी या आगामी चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. तो टीझर प्रेक्षकांना खूप आवडला. त्यामुळे या चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. अखेर या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे.
या ट्रेलरच्या सुरुवातीला अभिनेत्री वंदना गुप्ते या मंगळागौरीच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी चौकशी करताना दिसत आहेत. परंतु मंगळागौर खेळण्यासाठी जोडीला इतर महिलाही हव्यात! आधी काही जणींकडून नकार मिळाल्यानंतर त्या त्यांच्या पाच बहिणींना या मंगळागौरीच्या खेळात सहभागी होण्याबद्दल विचारतात. या मंगळागौरीच्या खेळामुळे या सहा बहिणी एकत्र येतात. प्रत्येकीला त्यांची त्यांची कामं, त्यांच्या त्यांच्या अडचणी असतात. त्यातील एक घटस्फोट घेणार असते, दुसरी संसारात बिझी असते, तिसरी तिच्या कामांमध्ये व्यग्र असते, तर त्यापैकी काहींना त्यांच्या घरातल्या पुरुषांची मर्जी राखून त्यांची स्वतःची कामं करावी लागत असतात. पण अर्ध आयुष्य संपलं आणि आपण स्वतःसाठी जगलोच नाही असं व्हायला नको, असा विचार करून त्या मंगळागौर खेळायचं ठरवतात. मग यावर त्यांच्या नवऱ्यांची काय प्रतिक्रिया असते? या मंगळागौरीच्या खेळामुळे त्या सहा जणींमध्ये नातं कसं तयार होतं? हे सगळं या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा : दाराबाहेर पत्रपेटी, जुना लाकडी दरवाजा…’असं’ आहे शाहीर साबळे यांचं मुंबईतील घर
केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा चौधरी या अभिनेत्री मुख्य भूमिकेत असणार आहेत. तर याबरोबरच अभिनेते शरद पोंक्षे, पियुष रानडे यांच्याही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचं कथानक महिलांभोवती फिरणारं असलं तरी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक पुरुषालाही हा चित्रपट बरंच काही सांगून जाणार आहे. हा चित्रपट ३० जून रोजी प्रदर्शित होईल.