“गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी…”, हे गाणं आजही ऐकू आलं तरी नाट्यरसिकांच्या डोळ्यासमोर एकच चेहरा उभा राहतो तो म्हणजेच सुपरस्टार भरत जाधव! ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमातून एक नवा चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला आला अन् अवघ्या काही दिवसांतच त्याने संपूर्ण मराठी कलाविश्वाला पछाडून टाकलं. रंगभूमीवर ‘हाऊसफुल्ल’ प्रयोगांची ‘जत्रा’ भरलेली असतानाच त्यांनी दिवसरात्र मेहनत करून ‘फक्त लढ म्हणा’चा नारा कायम ठेवला. संघर्षाच्या काळात कधीच ‘क्षणभर विश्रांती’ न घेता त्यांचा ‘आटापिटा’ कायम सुरू राहिला. अनेक वर्षांच्या कष्टानंतर गलगलेंची गाडी सुसाट निघाली अन् थेट ‘मुक्कामपोस्ट लंडन’ला जाऊन पोहोचली. अशा या दिलखुलास आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधणाऱ्या कलावंताच्या एन्ट्रीने मराठी कलासृष्टीत बरीच ‘उलाढाल’ झाली ज्याचं ‘अस्तित्व’ आजही टिकून आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बेताची परिस्थिती असलेल्या सामान्य कुटुंबात १२ डिसेंबर १९७३ रोजी भरत जाधव यांचा जन्म झाला. त्यांचं बालपण लालबाग परळच्या एका चाळीत गेलं. घरापासून राजाराम स्टुडिओ जवळच असल्याने त्यांच्या मनात लहानपणापासूनच कलेची गोडी निर्माण झाली होती. भरत यांचे वडील टॅक्सी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. १९८५ मध्ये ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या शाहीर साबळेच्या कार्यक्रमामधून त्यांना पहिली संधी मिळाली आणि पुढे काही दिवसातच भरत यांनी या संधीचं सोनं केलं. अभिनय, भारुड यातील बारकावे सहज शिकून घेतले. पुढे, १९९३ मध्ये रंगभूमीवर आलेल्या ‘ऑल द बेस्ट’ या नाटकाने त्यांच्या संपूर्ण आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली. या नाटकात भरत यांच्यासह अंकुश चौधरी आणि संजय नार्वेकर हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले होते. या नाटकाचे तब्बल ३ हजारांहून अधिक प्रयोग झाले.

हेही वाचा : Rajinikanth Birthday: रजनीकांत नावाचं ‘गारुड’!

‘ऑल द बेस्ट’ नाटक गाजल्यावर भरत यांनी अंकुशबरोबर ‘लक्ष्मी’ नावाचा पहिला चित्रपट केला. या दरम्यान ते ‘प्रपंच’ या छोट्या पडद्यावरील मालिकेत सुद्धा झळकले होते. ‘प्रपंच’ या मालिकेच्या शेवटच्या दिवसाचं शूट संपवून भरत जाधव बोरिवलीला एका नाटकाच्या प्रयोगासाठी जात होते. त्याचवेळी त्यांची पत्नी सरिता जाधव यांना बाळंतपणासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. नाटकाचा नियोजित प्रयोग असल्याने भरत यांनी ताबडतोब अंकुश चौधरीला फोन केला. अंकुशला रुग्णालयात पाठवून ते प्रयोग संपल्यावर पत्नी आणि त्यांचा लेक आरंभला भेटण्यासाठी गेले होते. या प्रसंगावरून त्यांचं कला आणि प्रेक्षकांवर असलेलं प्रेम आणि या सगळ्यात भरत यांच्या कुटुंबीयांनी त्यांना दिलेली खंबीर साथ याची प्रचिती आपल्याला येते.

भरत जाधव यांचं नाव जरी घेतलं तरी ‘सही रे सही’ हे नाटक डोळ्यासमोर उभं राहतं. या नाटकात त्यांनी बहुरंगी भूमिका साकारल्या आहेत. गेली १८ वर्ष या नाटकाचे प्रयोग सुरू असून ‘सही रे सही’ने रंगभूमीवर एक वेगळा इतिहास रचला आहे. याविषयी अभिनेते सांगतात, “या नाटकात माझ्या चार भूमिका आहेत आणि या चारही भूमिकांना प्रेक्षकांनी चांगलंच उचलून धरलं त्यामुळेच हे नाटक सुपरहिट झालं असं मी म्हणेन. केदार शिंदेची कल्पकता खरंच अद्भूत होती. त्याला रंगभूमीवर चार जण लिलया गुंतवून ठेवणारे हवे होते. अशाप्रकारची भूमिका वाट्याला येणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या दिवसापासून या नाटकाचे सगळे प्रयोग हाऊसफुल्ल होते. ३६५ दिवसांमध्ये ५६७ प्रयोगांचा उच्चांक गाठणारं हे पहिलचं नाटकं. हे श्रेय एकट्या भरत जाधवचं नव्हे तर संपूर्ण टीमचं आहे. ‘सही रे सही’ रंगभूमीवर आलं आणि माझं आयुष्य बदलून गेलं.” याबरोबरच त्यांच्या ‘श्रीमंत दामोदर पंत’, ‘अधांतर’ या नाटकांना देखील रंगभूमीवर भरभरून प्रतिसाद मिळाला. या सगळ्यात विजय चव्हाण यांच्यानंतर तेवढ्यात ताकदीने भरत जाधव यांनी साकारलेली ‘मोरुची मावशी’ प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहते.

हेही वाचा : ना महागडं हॉटेल, ना पर्यटनस्थळ…; वाढदिवशी ऐश्वर्या नारकरांनी दिली ‘या’ खास जागेला भेट, सर्वत्र होतंय कौतुक

रंगभूमीप्रमाणेच भरत जाधव यांना ‘पछाडलेमोठ्या पडद्यावरही भरभरून यश मिळालं. ‘जत्रा’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘खबरदार’, ‘गलगले निघाले’, ‘नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे’, ‘साडे माडे तीन’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘गोलमाल’ असे त्यांचे सगळेच चित्रपट प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनाशी कनेक्ट करणारे होते. या दरम्यान ‘भरत जाधव एंटरटेनमेंट प्रायव्हेट लि.’ या कंपनीची त्यांनी स्थापना केली आणि स्वत:ची व्हॅनिटी व्हॅन खरेदी केली. परंतु, आयुष्यात कितीही मोठ्या गाड्या आल्या तरीही टॅक्सीला विशेष महत्त्व कायम देणार असं ते आवर्जून सांगतात.

गेल्या काही महिन्यांपासून भरत जाधव मुंबई सोडून कुटुंबीयांबरोबर कोल्हापूरला राहत आहेत. अचानक मुंबईपासून दूर जाण्याचा निर्णय का घेतला? याविषयी भरत जाधव सांगतात, “मुंबई हे शहर आता बिझनेस हब झालं असून या शहराच्या वेगाशी जुळवून घेणं मला कठीण वाटतंय. माझं वय सुद्धा वाढतंय त्यामुळे आपल्याजवळ पैसे हवेत, आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणून मी मुंबईपासून दूर कोल्हापूरात राहण्याचा निर्णय घेतला. मुंबईत काम करून मिळणारे पैसे आणि इथे होणारा खर्च हा सारखाच आहे. या सगळ्या आर्थिक बाबींचा विचार करून मी कोल्हापूरला स्थायिक होण्याचे ठरवले. आम्ही तिथे राहावे, अशी माझ्या आईची इच्छा होती म्हणून आम्ही तिथे राहायला गेलो.”

हेही वाचा : “मी खूप विसरभोळी अन् तो…”, अनुष्का शर्माने भर कार्यक्रमात सांगितलेलं विराट कोहलीशी लग्न करण्याचं कारण

लालबागच्या व्ही. शांताराम यांच्या मालकीच्या छोट्याशा चाळीत मोठी स्वप्न पाहिलेल्या अन् ती पूर्ण करून मराठी कलाविश्वाचा सुपरस्टार ठरलेल्या प्रेक्षकांच्या लाडक्या ‘श्रीमंत दामू’ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharat jadhav birthday article first marathi actor to buy vanity and become superstar entdc sva 00
First published on: 12-12-2023 at 09:21 IST