मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) आणि भरत जाधव (Bharat Jadhav) हे दोन्ही अभिनेते त्यांच्या कॉमेडीच्या अचूक टायमिंगसाठी ओळखले जातात. त्याबरोबरच त्यांनी अनेक गंभीर भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. काही चित्रपटांत त्यांनी एकत्र कामही केले आहे. ‘साडे माडे तीन’, ‘डावपेच’, ‘शासन’, ‘उलाढाल’, ‘नाना मामा’, ‘खबरदार’, ‘जबरदस्त’, ‘बाबूराव ला पकडा’, ‘नाथा पुरे आता’, ‘माझ्या साजना’, ‘निशानी डावा अंगठा’ अशा अनेक चित्रपटांत या दिग्गज अभिनेत्यांनी एकत्र काम करीत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. दोघेही समकालीन अभिनेते असल्याने त्यांच्यात कधी स्पर्धा होती का, यावर अभिनेते भरत जाधव यांनी वक्तव्य केले आहे.

मक्याला मी त्याच्या…

भरत जाधव यांनी नुकतीच अमोल परचुरेंच्या ‘कॅचअप’ या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेकविध विषयांवर वक्तव्य केले. त्यांच्या वैयक्तिक, तसेच व्यावसायिक आयुष्याबाबत त्यांनी खुलेपणाने गप्पा मारल्या. याच मुलाखतीत त्यांना विचारले गेले की, मकरंद अनासपुरे यांच्याबरोबर कधी स्पर्धा होती का? त्यावर बोलताना भरत जाधव म्हणाले, “मक्याला मी त्याच्या एकांकिका स्पर्धेपासून ओळखतो. त्याने ‘देता आधार की करू अंधार’ ही एकांकिका केली होती. मकरंद आणि मंगेशने ती एकांकिका केली होती. तेव्हा माझं ‘ऑल द बेस्ट’ हे नाटक सुरू होतं. तिथून मी त्याला ओळखतो. तो चित्रपटात आला. ‘कायद्याचं बोला’ हा त्याचा मला खूप आवडलेला चित्रपट होता. नंतर त्याने कुठल्या तरी टीव्ही मालिकेत एक सीन केला होता. तो पाहिल्यानंतर चालू चित्रपटाच्या शूटिंगमध्ये भेटून मी त्याला सांगितलं होतं की, ही भूमिका मस्त केलीस.”

त्यावर अधिक बोलताना भरत जाधव म्हणाले, “आजही मक्याने ‘आता थांबायचं नाय’चा टीझर बघून त्याने मला फोन केला होता की, भारत्या मस्त वाटतंय रे, काहीतरी वेगळं करतोयस, असं वाटतंय. मला वाटत नाही की स्पर्धा हा प्रकार मराठीत आहे. अशोकमामा, लक्ष्यामामा होता तेव्हाही नव्हता. त्याआधीही नव्हता. स्पर्धेचा विचार स्पर्शही करत नाही. तेव्हाही करत नव्हता; आताही करत नाही. हा स्वाभाविक प्रश्न आहे. पण, त्याचा कुठेही स्पर्श आम्हाला तेव्हाही झाला नाही आणि आताही होत नाही.”

“आतासुद्धा ‘पुन्हा एकदा साडे माडे ३’ चे शूटिंग करताना आम्ही धमाल केली आहे. विषय वेगळा आहे. अंकुशने गोष्ट छान मांडली आहे. आमच्या तिघांपैकी कोणीही हीरो नाही. आम्ही आमच्या आमच्या वयात आहोत. ‘साडे माडे ३’मधीलच तिघे आहेत. तो निरागसपणा त्याने ठेवला आहे. आता भाग २ मध्ये रिंकू आहे. अंकुशने गोष्ट छान आणली आहे म्हणून आम्ही तिघे करायला तयार झालो. आमच्यासमोर तर अशोकमामा आहेत. आम्ही दोघं काय बोलणार? पण, त्यात अशोकमामा आम्हाला सांभाळून घेतात. सीनमध्ये काय करता येईल यावर बोलतात”, असे म्हणत मराठी सिनेसृष्टीत कधीही स्पर्धा नव्हती. मकरंद अनासपुरे यांच्याबरोबर कधीही स्पर्धा नव्हती, असे वक्तव्य भरत जाधव यांनी केले आहे.

दरम्यान, २००७ साली ‘साडे माडे ३’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यामध्ये अशोक सराफ, मकरंद अनासपुरे व भरत जाधव हे कलाकार प्रमुख भूमिकात दिसले होते. त्याबरोबरच सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर, सुकन्या कुलकर्णी, सुमित राघवन हे कलाकारही प्रमुख भूमिकांत दिसले होते. पुन्हा एकदा ‘साडे माडे ३’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरीने केले आहे. त्याबरोबरच भरत जाधव आता थांबायचं नाय या चित्रपटातदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्याच्याबरोबर या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ जाधवदेखील प्रमुख भूमिकेत आहे. १ मे २०२५ ला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.