नाटक, सिनेमा आणि मालिकांतील काही मोजक्या भूमिका साकारत भरत जाधव(Bharat Jadhav) यांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. कधी प्रेक्षकांना खळखळून हसवले, तर कधी रडवलेसुद्धा आहे. ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘दे धक्का’, ‘साडे माडे तीन’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘वन रूम किचन’, ‘खो-खो’, ‘श्रीमंत दामोदर पंत’, ‘जत्रा’, ‘येड्याची जत्रा’, ‘मुक्काम पोस्ट लंडन’, ‘माझी बायको तुझा नवरा’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘गोंद्या मारतंय तंगडं’, ‘उरूस’, ‘गलगले निघाले’, ‘बाबा लगीन’, ‘पछाडलेला’ अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या. त्यांच्या अनेक भूमिका मोठ्या प्रमाणात गाजल्या. मात्र, अलीकडच्या काळात ते चित्रपटांत फारसे दिसत नाहीत. आता यावर त्यांनी एका मुलाखतीत वक्तव्य केले आहे.
“अगदी प्रामाणिकपणे सांगतो…”
भरत जाधव यांनी नुकतीच अमोल परचुरेंच्या कॅचअप या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत भरत जाधव म्हणाले, “काही चित्रपट करताना मला त्याच त्याच प्रकारच्या भूमिका यायला लागल्या. त्यामुळे मी काही वर्षे थांबलो होतो. २०१६-१७ पासून थांबलो होतो. दरम्यानच्या काळात मी लंडन मिसळ हा चित्रपट केला. कारण- मी मैत्री खूप जपतो. अगदी प्रामाणिकपणे सांगतो की, काही दिग्दर्शक होते, त्यांच्याकडे असिस्ट करणारी मुलं असायची. ती मला म्हणायची की, एक चित्रपट आमच्यासाठी करा. तेव्हाचं सांगतोय; आताच म्हणत नाही. मी त्यावेळी विचार करायचो की, आता यांचं करिअर चालू होतंय, आपल्यामुळे राडा नको. एक चित्रपट करूयात. तर मी असेही चित्रपट केले आहेत.
चित्रपटात काम करणं चूक नाहीये. चित्रपटात काम करीत होतो. कारण- तो माझा व्यवसाय आहे. एकांकिका स्पर्धेतून नाटकात आलो. नाटकातून चित्रपटात आलो. नाटकांचे शो चालू ठेवणं हेही गरजेचं आहे. एका पॉइन्टला समजलं की, त्याच त्याच रोलसाठी विचारणा होत आहे. मग विचार केला की, सांभाळून सांभाळून करूयात. मोजकेच चित्रपट करूयात, असा विचार केला. त्यातील लंडन मिसळ हा जरा वेगळा होता. त्यात हीरोची भूमिका नव्हती; वेगळी होती. दोन मुलींची गोष्ट होती. म्हणून मी तो चित्रपट केला होता. त्या काळात मी एखाद-दुसरा चित्रपट केला असेल. पूर्वी मी लागोपाठ चित्रपट करीत होतो. त्यावेळी मी खूपच काम करीत होतो आणि ती गरजसुद्धा होती. मग आता थांबून जरा कोणती भूमिका चांगली आली किंवा मला वाटली. तसेच मी जर एखादी भूमिका याआधी साकारली नसेल, तर ती करायला हरकत नाही. आता स्वत:ला ट्राय आऊट करून बघायला हरकत नाही.
नाटक मी सातत्यानं करीत आहे. मी कुठे थांबलेलो नाही. इतकी वर्षं मी नाटक करतोय. नाटकातूनच मी चित्रपटात आलो होतो. चित्रपट बेकार आहेत किंवा मी दुय्यम स्थान देतोय, असं माझं अजिबात म्हणणं नाही. उलट चित्रपटांनी माझं घर वगैरे झालं. रसिक प्रेक्षकांचं प्रेम जास्त मिळालं. काही चांगले चित्रपट ज्याबद्दल मलाही माहीत नव्हतं की, हा चित्रपट लोकांना आवडेल, तो लोकांना आवडेल. ‘झिंग चिक झिंक’सारखा छान चित्रपट मिळाला होता. असं नाही की, मला वाईट चित्रपट मिळाले. चांगले चित्रपट मिळाले. लोकांनीही कौतुक केलं आहे. पण, एका लिमिटनंतर कळतं की जरासं हळू खेळूयात. तुम्हाला शिफ्ट होता आलं पाहिजे. आता माझ्या वयाला अमुक ही भूमिका नाहीये, हे स्वत: मान्य केलं पाहिजे. आमच्यात काही लोक ते मान्य करीत नाहीत किंवा दिग्दर्शक म्हणतात की, तू करू शकतोस. समोरचा किती सांगत असेल तरी आता त्या भूमिका करण्यात काही अर्थ नाही.”