मराठी चित्रपटसृष्टीत काही कलाकार असे आहेत, ज्यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान महत्वाचे मानले जाते. ज्यांच्या अभिनयाचे कौतुक केले जाते. त्यापैकी एक अभिनेता म्हणजे भरत जाधव(Bharat Jadhav) हे आहेत. आता त्यांनी एका मुलाखतीदरम्यान फक्त काही अभिनेत्यांमुळे इंडस्ट्री चालत नाही असे म्हटले आहे.
‘अल्ट्रा बझ मराठी’ या युट्यूब चॅनेलला भरत जाधव यांनी नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी नाटक आणि नवीन जे कलाकार, लेखक इंडस्ट्रीमध्ये येतात त्यांच्याबद्दल वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले भरत जाधव?
या क्षेत्रातील गुरू किंवा मार्गदर्शक म्हणून काय प्रयत्न करत आहात? या प्रश्नाला उत्तर देताना भरत जाधव यांनी म्हटले, “नवीन येणारी कलाकृती चांगली असायला हवी. ती विनोदीच असावी या मताचा मी नाही. गंभीर विषय असलेली चांगली नाटकं पण तुम्ही करायला पाहिजेत. चांगले लेखक मिळायले पाहिजेत. मी ज्या नाटकात सध्या काम करतोय तो नवीनच लेखक आहे. कोणी ना कोणी नवीन असतो ते जूना होतोच.”
“आम्ही कधीतरी नवीन होतो. कोणीतरी आमच्यावर विश्वास ठेवला म्हणून आम्ही नाव करू शकलो. जेव्हा अशी मुलं समोर येतात, त्यावेळी वाटतं की नवं-जूनं काही नसतं, तर त्या गोष्टीला महत्व असतं. फक्त भरत जाधव, प्रशांत दामले म्हणून इंडस्ट्री नाही तर येणाऱ्या नवीन मुलामध्ये जर प्रतिभा असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे. त्या काळात आमचेदेखील कोणीतरी स्वागत केले होते. आता आम्ही त्या टप्प्यावर आहोत, जिथे आम्ही नवीन लोकांचे स्वागत करतो. मी माझ्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, मला संकर्षण कऱ्हाडे, उमेश कामत ही सध्या नाटकात काम करणारी मुलं आहेत ती मला खूप आवडतात.”
“चित्रपट आणि इतर ठिकाणी काम करत असतानादेखील ते नाटकात सातत्य ठेवतात. महत्वाचे म्हणजे, फक्त मुंबई-पुणे या दोनच शहरात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातदेखील फिरत आहेत. ही गरज आहे. भरत जाधव किंवा प्रशांत दामले आम्ही पण मेहनतीनेच नाव मिळवले आहे. पण लोक सतत आम्हाला बघून कधीतरी कंटाळतील, तर नवीन पिढी आलीच पाहिजे. त्यामुळे इंडस्ट्री टिकेल आणि इंडस्ट्री टिकणं महत्वाचे आहे. म्हणून आमच्यासारख्या लोकांनी नवीन लोकांचे स्वागत करणेदेखील महत्वाचे आहे. हुशार असणाऱ्या लोकांना प्रोत्साहन दिले पाहिजे, त्यांची नावं झाली पाहिजेत, तर इंडस्ट्री टिकणार आहे.” असे भरत जाधव यांनी म्हटले आहे.