Bharat Jadhav : मराठी चित्रपटसृष्टीतील सच्चा कलाकार म्हटलं की, अभिनेते भरत जाधव यांचं नाव डोळ्यासमोर येतं. गेली अनेक वर्ष भरत जाधव मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अनेक नाटकांमधून आणि मराठी चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘जत्रा’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘शिक्षणाच्या आईचा घो’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘झिंग चिक झिंग’ या आणि अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही लक्षात आहेत. मात्र भरत जाधव हे मधल्या काळात मनोरंजन क्षेत्रापासून काहीसे लांब होते.
ब्रेक घेतलेल्या काळात नाना पाटेकरांकडून विचारपूस
भरत जाधव यांनी हा ब्रेक ठरवून घेतला होता. कामात तोच तोचपणा येत असल्याचे ओळखून हा ब्रेक घेतला असल्याचे त्यांनी स्वत: अनेक मुलाखतींमधून सांगितलं आहे. या काळात त्यांना त्यांच्या कुटुंबीयांचा मोठा आधार मिळाला होता. मात्र ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनीही त्या काळात स्वत:हून विचारपूस केली असल्याचं भरत जाधव यांनी सांगितलं आहे. भरत जाधव यांनी नुकतीच ‘व्हायफळ’ पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी ब्रेक घेतलेल्या काळाबद्दल भाष्य केलं आहे.
“ब्रेक घेतलेल्या काळात संपूर्ण कुटुंब माझ्याबरोबर होतं”
याबद्दल भरत जाधव असं म्हणाले की, “मी आयुष्यात सगळ्या गोष्टी सकारात्मक पद्धतीने घेतल्या आहेत. मधल्या काळात मी ब्रेक घेतला होता. हा ब्रेक माझ्या घरच्यांना आवडला होता. ते म्हणाले की, “आराम कर आणि पुन्हा सुरुवात कर”. ज्याचा फायदा मला आता होत आहे. पण अशा काळात मानसिक स्वास्थ्य सांभाळणं खूप महत्त्वाचं असतं. तेव्हा माझं संपूर्ण कुटुंब माझ्याबरोबर होतं आणि आणखी एका माणसाचं मी नाव घेईन ते म्हणजे नाना पाटेकर.”
“नाना पाटेकरांनी केलेल्या त्या फोनमुळे खूप बरं वाटलं”
यापुढे भरत जाधव म्हणाले की, “माझं तेव्हा व्यवस्थितच सुरू होतं; पण तेव्हा त्यांना कुठून तरी कळलं. तेव्हा त्यांनी मला फोन करून विचारलं की, “कसा आहेस? मला कळलं की, तू टेन्शनमध्ये आहेस. हे बघ काही टेन्शन असेल तर सांग आणि काहीही लागलं तर सांग. अगदी आर्थिक काही असेल तरी मला सांग. तू टेन्शन घेऊन काम करु नकोस.” मी तेव्हा टेन्शनमध्ये नव्हतोच पण त्यांना कुणी काय सांगितलं माहीत नाही. यामुळे मला खूप बरं वाटलं की, त्या व्यक्तीने मला फोन करून विचारलं.”
भरत जाधव यांचा ‘आता थांबायचं नाय’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
यानंतर भरत जाधव यांनी सांगितलं की, “आम्ही तसे भेटलो आहोत. गप्पा मारल्या आहेत. पण नकळत असा एक दिवस त्यांनी फोन येणं आणि माझी विचारपूस करणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. राजसाहेब ठाकरे त्यांनीसुद्धा मला त्या त्या वेळेस आधार दिला. मैत्री ही अशी असते. यामुळे आपल्याला नकळत प्रोत्साहन मिळतं असतं.” दरम्यान, भरत जाधव त्यांच्या आगामी ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. येत्या १ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे