‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेत अभिनेता भूषण प्रधान याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. नुकत्याच ‘नवशक्ती’ला दिलेल्या मुलाखतीत भूषणने महाराजांच्या भूमिकेविषयी तसेच ‘छावा’ चित्रपटाविषयी भाष्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला मिळणं हे माझं भाग्य आहे, असं सांगत भूषणने यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.

भूषण प्रधान म्हणाला, “आजवर मी विविध चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक सेटवर मला शेवटच्या दिवशी थोडं भावुक व्हायला होतं. पण, ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेच्या सेटवर जेव्हा शेवटचा दिवस होता तेव्हा यापैकी काहीच झालं नाही. मी माझ्या आई-बाबांना शेवटच्या दिवसाचं शूटिंग आहे असं सांगितलं त्यांचेही डोळे पाणावले. पण, मी नीट होतो…भावुक झालो नाही मला समजत नव्हतं असं का होतंय? मी खूप विचारात होतो आणि मला माझं उत्तर त्यातूनच मिळालं.”

अभिनेता पुढे म्हणाला, “मला असं जाणवलं माझे महाराजच माझ्याशी बोलत आहेत. ‘मी नाही जात आहे तुझ्यातून…तू ही भूमिका साकारताना जे काही शिकला आहेस त्या रुपात मी तुझ्यात कायम राहणार आहे’ आणि यामुळेच माझ्या डोळ्यात पाणी आलं नाही. महाराजांनी दिलेली शिकवण कायम माझ्याकडे राहणार आहे.

भूषण सांगतो, “महाराजांची भूमिका मिळण्यासाठी भाग्य लागतं. माझं असं झालं आयुष्यात ही मोठी संधी मिळाली तर, आपण ही भूमिका पुरेपूर जगायची. लोक काय बोलतील, कोणी इम्प्रेस होतंय का या गोष्टींकडे त्या क्षणाला लक्ष देणं आवश्यक नव्हतं. मला फक्त माझ्या भूमिकेला शंभर टक्के न्याय द्यायचा होता. प्रत्येक गोष्ट विचार करून करायची, प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करून प्लॅनिंग करायचं या सगळ्या गोष्टी माझ्यात महाराजांची भूमिका साकारताना आल्या.”

‘छावा’तील भूमिका का नाकारली?

“आपल्या नशिबात अनेक गोष्टी येतात पण, आयुष्यात आपण कशाला ‘हो’ म्हणतो आणि कशाला ‘नाही’ या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. कारण, महाराजांची भूमिका साकारल्यावर माझ्याकडे इतर अनेक ऐतिहासिक भूमिका आल्या. ‘छावा’ चित्रपटात सुद्धा एका भूमिकेसाठी मला विचारणा झाली होती. पण, मला असं लक्षात आलं की, आता मी महाराजांची भूमिका मालिकेच्या निमित्ताने एकदा साकारलीये. पण, केवळ हिंदी चित्रपट आहे म्हणून त्यातली कोणतीही भूमिका मी अशीच करणार नाही. अशावेळी ‘नाही’ बोलणं योग्य ठरतं. कारण, तो चित्रपट खूप मोठा होणार, आपण खूप लोकांपर्यंत पोहोचणार या गोष्टी माहिती होत्या. पण, तरीही मी माझी तत्त्व पाळली. मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. कारण, नुसतंच काम मिळतंय म्हणून ‘हो’ बोलायचं नसतं. हे मी माझ्या शिक्षणामुळे आणि अर्थात महाराजांची भूमिका साकारताना शिकलो.” असं भूषण प्रधानने सांगितलं.

Story img Loader