भूषण प्रधान हा सध्या मराठी सिनेविश्वातील आघाडीचा अभिनेता आहे. भूषणने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. गेल्या वर्षी भूषणचे दोन चित्रपट ‘जुनं फर्निचर’ आणि ‘घरत गणपती’ हे चांगलेच गाजले. चित्रपटांमध्ये तो प्रमुख भूमिकेत झळकला होता. या चित्रपटातील त्याच्या कामाचं भरभरून कौतुक करण्यात आलं होतं. नुकताच २०२५मधील त्याचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. ‘गाव बोलावतो’ असं भूषणच्या नव्या चित्रपटाचं नाव असून २१ मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे सध्या भूषण चर्चेत आहे.
‘गाव बोलावतो’ या चित्रपटात भूषण प्रधानसह गौरी नलावडे, माधव अभ्यंकर, श्रीकांत यादव असे अनेक कलाकार मंडळी महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत. या चित्रपटानिमित्ताने भूषण सध्या वेगवेगळ्या एंटरटेनमेंट वृत्तसंस्थेशी संवाद साधताना दिसत आहे. याचवेळी भूषणने एक किस्सा सांगितला, जो सध्या चर्चेत आला आहे.
‘कलाकृती मीडिया’शी संवाद साधताना भूषण प्रधानला विचारलं की, तू कधी सिग्नल तोडला आहेस का? आणि तुला पकडलं का? तेव्हा भूषण किस्सा सांगत म्हणाला, “हो. आजकाल मी कमी सिग्नल तोडतो. अगदी होतं नाही असं नाही. मला नियम पाळायला खूप आवडतात. पण एकदा मी आधी जिथे राहायचो तिथे सिग्नल तोडला होता. त्याच्या काही दिवस आधी तिथेच तेजश्री प्रधानने सिग्नल तोडला होता. मी जेव्हा पकडलो गेलो तेव्हा पोलिसांनी माझ्या आयडीवर नाव पाहिलं आणि म्हणाले, भूषण प्रधान…अभिनेते…हे वाचताच त्यांनी, तेजश्री प्रधान तुमची बहीण आहे का? तिने पण सिग्नल तोडला होता. तुम्ही दोघे भाऊ-बहीण असेच आहात का? मी म्हटलं, आम्ही अजिबात भाऊ बहीण नाही आहोत. त्यानंतर मी तेजश्री प्रधानला फोन केला आणि म्हटलं, तू सिग्नल तोडला होता का? कारण मला सुद्धा तुला पकडलेल्याच पोलिसाने पकडलं होतं. मी सुद्धा सिग्नल तोडला.”
पुढे भूषण प्रधान म्हणाला की, सिग्नल तोडल्यानंतर दंड भरायला मला काहीही वाटतं नाही. कारण ती चूक आहे. त्यामुळे दंड भरला पाहिजे. बऱ्याच वेळेला मला जाऊन दिलेलं आहे. कारण कलाकारांचं विशेष कौतुक केलं जातं. आतापर्यंत एकदाही सिग्नल न तोडलेला व्यक्ती कोण असेल, असं मला वाटतं नाही.
दरम्यान, भूषण प्रधानच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर त्याचा ‘स्वप्नसुंदरी’ नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला आणि चित्रीकरणाला सुरुवात झाली. अक्षय शिंदे दिग्दर्शित ‘स्वप्नसुंदरी’ या चित्रपटात भूषणसह सायली पाटील पाहायला मिळणार आहे. याशिवाय भूषण बऱ्याच नव्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.