‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि टिकटॉक स्टार म्हणजे सूरज चव्हाण. (Suraj Chavan) सोशल मीडियावर आपले अनेक व्हिडीओ शेअर करणारा सूरज ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi) मध्ये सहभागी झाला आणि चांगलाच प्रसिद्धीझोतात आला. सुरुवातीला खेळ न समजणाऱ्या सूरजने या शोच्या अखेरपर्यंत मजल मारली. शिवाय विजेतेपदावर आपलं नावदेखील कोरलं. या विजेतेपदाबरोबरच त्याला मराठी चित्रपटाची ऑफर मिळाली. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या (Bigg Boss Marathi 5) पर्वाच्या महाअंतिम सोहळ्यात केदार शिंदेंनी ‘झापुक झुपूक’ (Zapuk Zupuk) या चित्रपटाची घोषणा केली होती. नुकतंच या चित्रपटाचे चित्रीकरण पार पडलं.

सूरजला घेऊन एक चित्रपट करणार असून या चित्रपटाचं नाव ‘झापुक झुपूक’ (Zapuk Zupuk) असणार, असं केदार शिंदे यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर डिसेंबर २०२४ च्या अखेरीस चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला आणि आता चित्रपटाचं चित्रीकरण यशस्वीरित्या पूर्ण झालं आहे, त्यामुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारा सूरज आता मराठी सिनेसृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. केदार शिंदे (Kedar Shinde) या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, तर सूरज या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे; तर याच पर्वातील अंकिता वालावलकरच्या (Ankita Walawalkar) पतीने म्हणजेच संगीतकार कुणाल भगतने (Kunal Bhagat) चित्रपटासाठी संगीत दिलं आहे.

गायक रविंद्र खोमणेने याबद्दलची एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. रविंद्रने कुणालबरोबरचा फोटो शेअर करत असं म्हटलं आहे की, “केदार शिंदे (Kedar Shinde) निर्मित ‘झापूक झुपूक’ (Zapuk Zupuk) या चित्रपटात अभिनेता म्हणून नवीन चेहरा ‘बिग बॉस’ विजेता सूरज चव्हाण दिसणार आहे. या मराठी चित्रपटासाठी एक सुंदर गाणं रेकॉर्ड केलं. याचं संगीत माझे मित्र कुणाल-करण यांनी केलं आहे. यासाठी गाणं करताना खूप मज्जा आली, लवकरच हे गाणं तुमच्या भेटीला येणार आहे.”

दरम्यान, ‘झापुक झुपूक’ (Zapuk Zupuk) चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदेंनी केलं असून चित्रपटात सूरज चव्हाणसह इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, जुई भागवत, पुष्कराज चिरपूटकर, मिलिंद गवळी व दीपाली पानसरे ही कलाकार मंडळीदेखील झळकणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे, बेला शिंदे व जिओ स्टुडिओजने केली आहे. येत्या २५ एप्रिलपासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader