छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणजे ‘बिग बॉस मराठी’. या कार्यक्रमाचे चार पर्व चांगलेच गाजले. ‘बिग बॉस’ गाजवलेली मंडळी आता ‘दिल दोस्ती दिवानगी’ करताना दिसणार आहेत. आपल्या दमदार अभिनयाने भूमिका लीलया साकारणारे अभिनेते विद्याधर जोशी, अभिनेत्री सुरेखा कुडची, वीणा जगताप आणि स्मिता गोंदकर लवकरच एका चित्रपटात झळकणार आहेत. ‘दिल दोस्ती दिवानगी’ असे या चित्रपटाचे नाव आहे.
‘दिल दोस्ती दिवानगी’ या चित्रपटात मैत्री, प्रेम त्यानंतरचं आयुष्य यात अडकलेल्या प्रेमवीरांची कथा दाखवण्यात येणार आहे. या प्रेमकथेच्या प्रवासात वळणावळणावर घडणाऱ्या अनपेक्षित गोष्टी, याचा रंजक अनुभव देणारा हा चित्रपट आहे. त्यामुळे प्रेक्षक यात नक्कीच गुंतून जातील असा विश्वास हे कलाकार व्यक्त करत आहेत.
आणखी वाचा : “मला अमेय खोपकरांनी फोनवरुन धमकी दिली”, प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाचा गौप्यस्फोट, म्हणाले “मी कुशलला…”
या चित्रपटात विद्याधर जोशी मायकेल ब्रिगेन्झा, सुरेखा कुडची मिस मेरी या कॅथलिक व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. तर स्मिता गोंदकर रिया आणि वीणा जगताप श्रिया हे ग्लॅमरस अंदाजातील पात्र साकारणार आहे. या चौघांसोबत कश्यप परुळेकर, चिराग पाटील, अतुल कवठळकर, तीर्था मुरबाडकर, तपन आचार्य, दुर्वा साळोखे, कंवलप्रीत सिंग, प्रदीप वेलणकर, विजय पाटकर, स्मिता जयकर हे कलाकार ही चित्रपटात दिसणार आहेत.
दरम्यान ट्रान्स इंडिया मिडिया अँड एन्टरटेनमेन्टची प्रस्तुती असलेल्या ‘दिल दोस्ती दिवानगी’ चित्रपटाची निर्मिती राजेंद्र राजन यांनी केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिरीष राणे यांनी केले आहे. हा चित्रपट ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे.
आणखी वाचा : Video : सई ताम्हणकरने मुंबईत खरेदी केलं हक्काचं घर, जुन्या घराला ‘गुडबाय’ करताना म्हणाली “भूतकाळातील…”
‘दिल दोस्ती दिवानगी’ चित्रपटाचे छायांकन धनंजय कुलकर्णी तर संकलन अमोल खानविलकर यांचे आहे. कथा, पटकथा, संवाद दीपक तारकर यांचे आहेत. अवधूत गुप्ते, वैशाली सामंत,सोनाली पटेल यांच्या आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहे. सोनाली उदय यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. कार्यकारी निर्माते अनुराधा बोरीचा, इ.सुरेश प्रभाकर आहेत. सहाय्यक दिग्दर्शक जुईली पारखी आहेत. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि राजेश बिडवे यांचे असून कलादिग्दर्शक केशव ठाकूर आहेत.