Suraj Chavan And Ankita Walawalkar Dance : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपट २५ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे सध्या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. ‘झापुक झुपूक’ चित्रपटानिमित्ताने सूरज ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील स्पर्धकांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहे. अभिजीत सावंत, योगिता चव्हाण यांच्यानंतर त्यानं अंकिता वालावलकरची भेट घेतली. यावेळी दोघांनी जबरदस्त डान्स केला. सूरज व अंकिताच्या डान्सचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

सूरज चव्हाणने अंकिता वालावलकरबरोबरचा डान्स व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “माझी लाडकी अंकिता ताई, तिच्याबरोबर गोलीगत नाचला ना, ह्यो सूरज भाई… अंकिता ताईनं ‘बिग बॉस’च्या घरापासून ते आजपर्यंत मला कायम सपोर्ट केलाय…लय चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवल्या. लय काळजी घेतली…परवा तिच्याकडे कोकणचे हापूस आंबे खाल्ले. येक नंबर ओरिजिनल….लय भारी जेवलो घरी एकदम क्वॉलिटी…अंकिता ताई आणि कुणाल दाजी असंच प्रेम कायम असू द्या…२५ एप्रिलपासून सगळ्यांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघा आणि आता पटकन तिकिट काढा…”

या व्हिडीओमध्ये, सूरज चव्हाण व अंकिता वालावलकर ‘झापुक झुपूक’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना पाहायला मिळत आहे. त्यानंतर सूरज मालवणी भाषेत ‘झापुक झुपूक’ चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षकांना आवाहन करत आहे. तसंच अंकिता देखील आपल्या चाहत्यांना सूरजनं मेहनतीनं केलेला हा चित्रपट आवर्जुन पाहण्यासाठी सांगताना दिसत आहे. दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, ‘झापुक झुपूक’ चित्रपटात सूरज चव्हाणसह इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, जुई भागवत, दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी अशी तगडी कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत. अलीकडेच या चित्रपटातील नवीन गाणं ‘वाजीव दादा’ हे प्रदर्शित झालं. ज्यामध्ये सूरजसह जान्हवी किल्लेकर, घनःश्याम दरवडे, वैभव चव्हाण आणि इरिना पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षी ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्यात केदार शिंदेंनी ‘झापुक झुपूक’ चित्रपटाची घोषणा केली होती. सूरजला घेऊन एक चित्रपट करणार असून, या चित्रपटाचं नाव ‘झापुक झुपूक’ असणार, असं केदार शिंदे यांनी जाहीर केलं होतं.