‘बिग बॉस’ मराठीच्या तिसऱ्या पर्वामुळे अभिनेता विशाल निकम चांगलाच लोकप्रिय झाला. दमदार खेळाच्या जोरावर त्याने तिसऱ्या पर्वाच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं होतं. आता लवकरच विशाल ऐतिहासिक चित्रपटामध्ये झळकणार आहे. नुकतंच विशालने त्याच्या अगामी चित्रपटातील लूकची झलक शेअर केली आहे.
हेही वाचा-
विशालने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाच्या सेटवरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवरुन तो चित्रपटात ऐतिहासिक भूमिका साकारत असल्याचे दिसून येत आहे. हा फोटोला त्याने श्वासात राजं..ध्यासात राजं…अशी कॅप्शनही दिली आहे. तसेच त्याने नशीबवान, छत्रपती शिवाजी महाराज असे कॅप्शनही वापरले आहेत. मात्र, अद्याप विशालच्या या अगामी चित्रपटाचे नाव व त्याच्या भूमिकेबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, फोटोमधील लूक व कॅप्शनवरुन तो चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याची चर्चा सुरु आहे.
विशालची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर लाईक व कमेंट केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच विशाल ज्योतिबाच्या मंदिरात दर्शनासाठी गेला होता. मंदिरात विशालला पाहून चाहत्यांनी त्याच्याबरोबर फोटो काढण्यासाठी एकच गर्दी केली होती. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशालच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’, ‘आई- मायेचं कवच’ या मालिकांमध्ये त्याने काम केले आहे. ‘बिग बॉस’ मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा तो विजेता आहे.