Zapuk Zupuk Movie Teaser : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमुळे सूरज चव्हाण हे नाव घराघरांत लोकप्रिय झालं. शोमध्ये एन्ट्री घेतल्यावर सूरजने महाराष्ट्रातील घराघरांत आपला वेगळा चाहतावर्ग निर्माण केला. त्याचा सरळसाधा स्वभाव प्रत्येकाला भावला. सूरजने लाखो चाहत्यांची मनं जिंकून बिग बॉस मराठीच्या झगमगत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं. महाअंतिम सोहळ्यात दिग्दर्शक केदार शिंदे यांनी लवकरच सूरजला घेऊन सिनेमा बनवणार ही मोठी घोषणा केली होती आणि आता हा ‘गुलीगत किंग’ रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे.

सूरज चव्हाण लवकरच ‘झापुक झुपूक’ या मराठी सिनेमात दिसणार आहे. जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित या सिनेमाचा धमाकेदार टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

सूरजचा एक प्रसिद्ध डायलॉग आहे ज्यात तो म्हणतो, “मार्केट गाजवायला आणि पोरीला लाजवायला सूरज चव्हाणच्या नजरेतच दम आहे” असाच त्याच्या ‘झापुक झुपूक’ सिनेमाचा टिझर दमदार आणि गाजवणारा आहे. ४५ सेकंदाच्या टिझरमध्ये चित्रपटाची लहानशी झलक पाहायला मिळते, सूरजची कॉमेडी, हटके स्टाईल त्याचा भन्नाट अभिनय या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना सिनेमामध्ये अनुभवायला मिळणार आहेत.

अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून वर येऊन सूरजने प्रसिद्धी मिळवत आपली माणुसकी जपली. त्याची अकल्पनीय आणि प्रशंसनीय मेहनत आता मोठ्या पद्यावर पाहायला मिळणार आहे. मराठी मातीतल्या या साध्याभोळ्या सूरजसाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ निर्माण झाली आहे. या टीझरमधील शेवटचा क्षण पाहून नेटकरी भावुक झाले आहेत. यात सूरज आपल्या बहिणीला म्हणतो, “ताई तू म्हणायची तेच खरं…लोक वेडं बनवून जातात आणि मी बनतो”

Zapuk Zupuk Movie Teaser
Zapuk Zupuk Movie Teaser

सूरज चव्हाणसह या चित्रपटात जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. हल्लीच सूर ने जेजुरीच्या खंडोबा देवाचं, आईमरी मातेचं आणि मोरगावच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेत सिनेमाच्या प्रमोशनची जोरदार सुरुवात केली आहे.

दरम्यान, जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित आणि दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ हा सिनेमा येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्रातील सिनेमागृहांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader