आजकाल अभिनेते अभिनेत्री चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हटके संकल्पना करत असतात. हिंदी चित्रपटांच्या बरोबरीने आता मराठी चित्रपटदेखील प्रमोशनमध्ये मागे नाहीत. नुकताच प्रदर्शित झालेला ‘हर हर महादेव’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर गाजतोय. या चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखा साकारणाऱ्या शरद केळकरने प्रमोशनसाठी थेट वाघा बॉर्डर गाठली.
‘हर हर महादेव’ चित्रपटाची जोरदार चर्चा होती. या चित्रपटाच्या टीझरपासून प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. कारण चित्रपटाच्या टीझरला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आवाज दिला होता. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकार ठिकठिकाणी जात होते. शरद केळकरने नुकतीच वाघा बॉर्डरला भेट दिली. भारतीय सैनिकांबरोबर त्याने दिवाळी साजरी केली तसेच चित्रपट बघण्याचे आवाहनदेखील केले. झी स्टुडिओने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर करत ही माहिती दिली.
“कमकुवत राजकारणी धर्माचा…”; नोटांवरील फोटोंच्या वादावरून गौहर खान केजरीवालांवर संतापली
२५ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी चित्रपटाने २.२५ कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटाचे सध्या सगळे कौतुक करत आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी चित्रपटाचे कौतूक केले आहे. ‘हर हर महादेव’च्या बरोबरीने अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ आणि अजय देवगणचा ‘थँक गॉड’ असे दोन हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.
या चित्रपटात सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर, सायली संजीव, निशिगंधा वाड, अशोक शिंदे, मिलिंद शिंदे, हार्दिक जोशी, किशोर कदम, शरद पोंक्षे हे कलाकार झळकले आहेत. ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केले आहे.