आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेला चित्रपट ‘स्थळ’ ७ मार्चला प्रदर्शित झाला. त्यामुळे अनेक फिल्म फेटिव्हलमध्ये नावाजलेला आणि बरेच पुरस्कार विजेत्या ‘स्थळ’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. मराठी सिनेसृष्टीतील महागुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन पिळगांवकरांनी या चित्रपटाला प्रस्तुत केलं आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, संदेश कुलकर्णी, जयंत वाडकर, स्वप्नील जोशी, मधुर भांडारकर, प्रथमेश परब, अशोक सराफ, अवधूत गुप्ते अशा मराठी कलाकारांनी ‘स्थळ’ चित्रपटाचं कौतुक करत प्रेक्षकांना बघण्यासाठी आवाहन केलं आहे. बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी देखील सचिन पिळगांवकरांच्या या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिला दिनाचं औचित्य साधत ‘स्थळ’ चित्रपट ७ मार्चला प्रदर्शित झाला असून याचं दिग्दर्शन जयंत दिगंबर सोमलकर यांनी केलं आहे. या चित्रपटात नंदिनी चिकटे, तारानाथ खिरटकर, संगीता सोनेकर, सुयोग ढवस, संदीप सोमलकर, संदीप पारखी, स्वाती उलमले, गौरी बदकी, मानसी पवार या नव्या दमाच्या कलाकारांनी खूप चांगलं काम केलं आहे. त्यामुळे सध्या ‘स्थळ’ चित्रपटासह कलाकारांच्या कामाचं विशेष कौतुक होतं आहे. या चित्रपटाबद्दल जया बच्चन काय म्हणाल्या? जाणून घ्या…

‘स्थळ’ चित्रपटाच्या इन्स्टाग्राम पेजवर जया बच्चन यांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये जया बच्चन म्हणाल्या, “सचिन, तुम्ही मला बोलावलंत यासाठी मी तुमचे आभार मानते. काही कलात्मक कामं असतात, ज्याबाबतीत बोललं जात नाही. पण, असे चित्रपट तयार केले पाहिजे. समाजासाठी खूप महत्त्वाचं आहे. अजून काही बोलायचं झालं तर हा खरा चित्रपट. मला खूप आवडला. या चित्रपटासाठी ईश्वर चरणी प्रार्थना. खूप साऱ्या शुभेच्छा.”

दरम्यान, ‘स्थळ’ चित्रपट मामी फेस्टिव्हलमध्ये श्रिया पिळगांवकरने सर्वातआधी पाहिला होता. त्यानंतर श्रियाच्या आग्रहास्तव सचिन पिळगांवकर व सुप्रिया पिळगांवकरांनी नाफा फिल्म फेस्टिव्हलमध्ये पाहिला. त्यावेळी दोघांना हा चित्रपट प्रचंड आवडला होता. महाराष्ट्रातील मातीत रूजलेल्या या चित्रपटाला अमेरिकेच्या मराठी लोकांनी डोक्यावर घेतलेलं पाहून पिळगांवकरांनी दिग्दर्शक जयंत सोमलकरांना सांगितलं, “चित्रपट प्रदर्शित करताना काही मदत लागल्यास आवर्जून सांगा.” तेव्हा सोमलकर यांनी सचिन पिळगांवकरांना चित्रपटाची प्रस्तुती करण्यास विचारलं. यावेळी लगेच सचिन यांनी होकार दिला होता.