विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज ४’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. २०१७ मध्ये या चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यानंतर २०१८ मध्ये दुसरा भाग आणि २०२२ मध्ये ‘बॉईज’ चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शित झाला. येत्या २० ऑक्टोबरला चित्रपटाचा चौथा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बॉईज’ मालिकेच्या सर्व चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. विशाल देवरुखकरने या चित्रपटाच्या दिग्दर्शनासह लेखनाची जबाबदारीही सांभाळली आहे. सध्या त्याची संपूर्ण टीम या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकत्याच पार पडलेल्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात विशालने मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्याने चित्रपटाबद्दल अनेक खुलासे केले.
दिग्दर्शक विशाल देवरुखकरला नुकत्याच एका मुलाखतीत ‘बॉईज’ चित्रपटाच्या मालिकेत आणखी किती चित्रपट येऊ शकतात? असा प्रश्न विचारण्यात आला. तारांगणशी संवाद साधताना विशाल म्हणाला, “अवधूत गुप्तेंना हा प्रश्न विचारल्यास ते ७४ ते ७५ भाग करणार असं उत्तर देतात आणि त्यांच्या म्हणण्यानुसार लोकांचं प्रेम मिळेपर्यंत मी हे भाग बनवत राहणार हे शंभर टक्के सांगतो.”
हेही वाचा : Video : “अशी खलनायिका…”, ‘सुख म्हणजे काय असतं’ मालिकेत शालिनी करणार जबरदस्त अॅक्शन सीन्स, नेटकरी म्हणाले…
“आतापर्यंत माझ्याकडे पुढच्या ३ भागांच्या स्क्रिप्टस लिहून पूर्ण झाल्या आहेत. म्हणजेच हे ४ पकडून एकून ७ भाग इथेच होतात. भविष्यात हे भाग कधी व कोणत्या वेळेत प्रदर्शित होतील हे प्रेक्षकांना येत्या काही दिवसांत कळेल.” असं विशालने सांगितलं.
हेही वाचा : “त्यांच्या शेजारी उभं राहण्याची…”, ‘बिग बीं’च्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखने शेअर केला Unseen फोटो
दरम्यान, बहुचर्चित ‘बॉईज ४’ चित्रपट येत्या २० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखिल बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.