लोकेश गुप्ते(Lokesh Gupte) दिग्दर्शित ‘अशी ही जमवा जमवी'(Ashi Hi Jamva Jamvi) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. अशोक सराफ(Ashok Saraf), वंदना गुप्ते, सुनील बर्वे तसेच चैत्राली गुप्ते या चित्रपटांत प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत. यामध्ये अशोक सराफ व वंदना गुप्ते यांची जुगलबंदी पाहायला मिळणार असल्याचे प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. आता चैत्राली गुप्तेने हेमंत ढोमेशी बोलताना या चित्रपटात तिला भूमिका कशी मिळाली, याबद्दल खुलासा केला आहे.
चैत्राली गुप्ते म्हणाली…
लोकेश गुप्ते आणि चैत्राली गुप्ते हे पती-पत्नी आहेत. ‘अशी ही जमवा जमवी’ हा चित्रपट लोकेश गुप्तेने दिग्दर्शित केला आहे. राजकमल एंटरटेनमेंटने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, ‘अशी ही जमवा जमवी’ चित्रपटात काम करण्याची संधी कशी मिळाली, कशी कास्टिंग झाली? असा प्रश्न हेमंत ढोमेने चैत्रालीला विचारला. यावर बोलताना चैत्राली गुप्ते म्हणाली, “मागणी केली असती तर पहिल्याच चित्रपटात मी कास्ट झाले असते. तो म्हणतो, मला योग्य वाटू दे, तेव्हा तो रोल तू करशील; त्यामुळे ते तर कधीच झालं नाही. मागणी करावी लागली नाही, कारण मला माहीत आहे की तिथून होकार येणार नाही, तर मी कायम गप्पच राहिले. पण, याचं श्रेय शंतनू भाके या आमच्या कास्टिंग डायरेक्टरला जातं. त्याने लोकेशला असं सांगितलं की, या भूमिकेसाठी मला चैत्राली चांगली वाटते. तेव्हा लोकेशने असा विचार केला की, विचारायला हरकत नाही. त्याने मला याबद्दल काहीच विचारलं किंवा सांगितलं नाही.”
पुढे अभिनेत्री म्हणाली, शंतनूचा फोन आला. मला वाटलं की जाहिरातीसाठी मला शंतनूचा बऱ्याच वेळा फोन येतो, त्यासाठी त्याचा फोन आला असेल. जेव्हा त्याने मला या चित्रपटातील भूमिकेसाठी विचारले तर मला आश्चर्य वाटले. त्यावर तो म्हणाला की, आमची अशी चर्चा झाली, त्याला लोकेश सर ओके म्हणाले. मी म्हटलं की मला ओकेच आहे, मी वाटच बघत होते.
लोकेशने तुला घरी सांगितलं नाही का? असं विचारल्यानंतर चैत्राली गुप्ते म्हणाली, “नाही. तो बाकी सगळं सांगतो, पण ही एक गोष्ट सांगितली नाही की आमची चर्चा झाली आणि तुला असा फोन येईल. मला माहीत नव्हतं”, असे म्हणत ‘अशी ही जमवा जमवी’ चित्रपटात तिचं कास्टिंग कसं झालं, याबद्दलचा किस्सा तिने सांगितला.
दरम्यान, ‘अशी ही जमवा जमवी’ चित्रपटात अशोक सराफ, वंदना गुप्ते, सुनील बर्वे यांच्याबरोबर चैत्राली गुप्ते, मिलिंद फाटक, सुलेखा तळवलकर, पुष्कराज चिरपुटकर, ओमकार कुलकर्णी, तनिष्का विशे असे लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.