अभिनेत्री चैत्राली गुप्ते(Chaitrali Gupte)गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. लवकरच ती लोकेश गुप्ते दिग्दर्शित ‘अशी ही जमवा जमवी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात वंदना गुप्ते व अशोक सराफ यांची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमध्ये अशोक सराफ व वंदना गुप्ते एका वेगळ्या अंदाजात दिसत आहेत. सुनिल बर्वे, पुष्कराज चिरपुटकर हे कलाकारदेखील प्रमुख भूमिकांत आहेत. आता चैत्राली गुप्तेने नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला कामाच्या ठिकाणी रिजेक्शनचा सामना कधी करावा लागला होता का,यावर भाष्य केले आहे.

मला खूप ताप…

चैत्राली गुप्तेने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्रीला विचारण्यात आले की एखादी ऑडीशन दिली आहे आणि काम मिळालं नाही, नकाराचा सामना करावा लागला आहे, असं कधी घडलंय का? कोणता नकार जिव्हारी लागला आहे का? यावर बोलताना चैत्राली गुप्ते म्हणाली, “‘वादळवाट’साठी मला विचारलं होतं आणि मला खूप ताप होता. त्यांना खूप घाईत लूक टेस्ट आणि ऑडिशन करायची होती. मला शशांकचा फोन आला होता. मी शशांकला म्हटलं होतं की उठूच शकत नाहीये, मी ऑडिशन कशी देऊ? तो मला म्हणाला होता की काहीही कर ये. पण ती भूमिका मला मिळाली नाही, इतर कोणाला तरी मिळाली याचं मला दु:ख नाहीये. पण, हो मला मिळाला असता तर आनंद नक्की झाला असता. मी याला रिजेक्शन म्हणणार नाही.

पुढे बोलताना चैत्राली गुप्ते म्हणाली, “खूप वर्षे चालत आलेली ‘यह रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेसाठी मी २ वर्षापूर्वी मी ऑडीशन दिली होती. त्याचं मॉकशूटही झालं होतं. हे पात्र माझंच आहे, मी ते चांगलं करू शकेन. मी हे करणार असं मला वाटत होतं. मी राजनशाहीबरोबर खूप काम केले आहे, त्यांच्याबरोबर चांगले संबंध आहेत, त्यामुळे त्यांनाही वाटत होतं की हे होईल. पण काही कारणांमुळे झालं नाही.”

एखादं काम मिळालं नाही तर तू त्याचा कधी विचार करतेस का? यावर बोलताना अभिनेत्री म्हणाली, “पूर्वी खूप विचार करायचे. त्याचा खूप त्रासही व्हायचा. मी आठ-आठ दिवस त्यातच असायचे. हे असं का झालं असेल? माझा का विचार केला नसेल? अशा विचार करायचे. मग आठ दिवसानंतर मी ती मालिका बघायचे. मग त्या अभिनेत्रीला घेतलं आहे तर मला का घेतलं नाही? असा विचार करत असायचे.”