उत्तम अभिनय शैलीद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते म्हणून भाऊ कदम यांना ओळखले जाते. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे ते महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले. सध्या ते करुन गेलो गाव या नाटकामुळे चर्चेत आहेत. नुकतंच त्यांनी नाटक की चित्रपट यातील आवडतं माध्यम कोणतं? याबद्दल भाष्य केले.
भाऊ कदम यांनी नुकतंच एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत नाट्यक्षेत्राबद्दल त्यांचं मत मांडले. यावेळी त्याने त्यांच्या सध्या सुरु असलेल्या नाटकांच्या प्रयोगाबद्दलही भाष्य केले. यावेळी त्यांनी नाटकाचे दिग्दर्शन करण्याबद्दलची इच्छाही व्यक्त केली.
आणखी वाचा : “विनोदी अभिनेता हा शिक्का…” भाऊ कदम यांचे स्पष्ट वक्तव्य, म्हणाले “अनोळखी प्रेक्षकांनाही…”
“गणेशोत्सव हा सण कामासाठीची ऊर्जा द्विगुणित करतो. सध्या मी आणि ओंकार भोजने करुन गेलो गाव या नाटकाचे प्रयोग करत आहोत. आतापर्यंत या नाटकाचे जवळपास ८५ प्रयोग झाले आहेत. सध्या आम्ही सातारा दौऱ्यावर आहे. या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं काम करायला आणखी मजा येते”, असे भाऊ कदम यांनी सांगितले.
“चित्रपट आणि नाटक यात माझ्या सर्वाधिक आवडीचं माध्यम हे नाटक आहे. याचं कारण तुम्हाला थेट प्रेक्षकांसमोर सादरीकरण करता येते. यात कोणताही रिटेक नसतो. सहज आणि उत्स्फूर्त अभिनयाची मजा वेगळी आहे. कलाकार म्हणून इतर माध्यमांत कितीही काम केलं, तरी नाटक अधिक जवळचं वाटतं”, असेही त्यांनी म्हटले.
आणखी वाचा : लाडक्या बाप्पाला निरोप देताना श्रेया बुगडे भावूक; म्हणाली, “पाच दिवसात तुझ्यासमोर हात जोडताना…”
“जर भविष्यात मला दिग्दर्शनात यायचं असेल तर मी नाटक हाच पर्याय निवडीन. पण त्याबरोबरीने मला चित्रपटाचं दिग्दर्शन करायलाही आवडेल. पण सध्या याबद्दल मी विचार केलेला नाही. मी नव्वदच्या दशकापासून रंगभूमीवर काम करत आहे. त्यामुळे जर चांगली कथा असेल तर मी नाटकाचं दिग्दर्शन नक्कीच करेन, ते करायला मला मनापासून आवडेल”, अशी इच्छा भाऊ कदम यांनी व्यक्त केली.