मुंबईत शनिवारी, २० मे रोजी दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्कार सोहळ्यात मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरला ‘चंद्रमुखी’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या निमित्ताने अमृताने आनंद व्यक्त करत इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा : ‘आदिपुरुष’ चित्रपटातील ‘जय श्री राम’ गाण्याने केला नवा रेकॉर्ड, अवघ्या २४ तासांत…
अमृता खानविलकर तिचा आगामी चित्रपट ‘कलावती’च्या शूटिंगसाठी सध्या लंडन दौऱ्यावर असल्याने या पुरस्कार सोहळ्याला ती उपस्थित राहू शकली नाही, परंतु अमृताच्या वतीने तिच्या पालकांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे. आई-वडिलांनी पुरस्कार स्वीकारल्याचा फोटो अमृताने इन्स्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, “काही जणांना आनंद साजरा करण्याच्या खूप कमी संधी मिळतात… आणि या वेळी मी नक्कीच माझा आनंद व्यक्त करणार आहे, कारण पहिल्यांदाच माझ्या पालकांनी माझ्यावतीने पुरस्कार स्वीकारला आहे. ‘चंद्रमुखी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून माझा सन्मान केल्याबद्दल दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन आणि रसिक प्रेक्षकांचे खूप आभार… आई-बाबा धन्यवाद, तुम्ही माझ्यावतीने हा पुरस्कार स्वीकारून माझा आनंद द्विगुणित केलात.”
हेही वाचा : शरद केळकरने सांगितला ‘आदिपुरुष’च्या हिंदी डबिंगचा अनुभव, म्हणाला “दिग्दर्शकाला पहिल्या दिवसापासून…”
अमृताने ही पोस्ट शेअर केल्यावर तिच्या नवऱ्यासह अनेक चाहत्यांनी तिचे अभिनंदन केले आहे. मुंबईतील मुकेश पटेल सभागृहात दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार सोहळ्याचे २० मे रोजी आयोजन करण्यात आले होते. पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला बॉलीवूडच्या अनेक बड्या सेलेब्रिटींनी हजेरी लावली होती, या कार्यक्रमात मराठी चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल अभिनेत्री मानसी नाईक आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला सन्मानित करण्यात आले.