‘वाजले की बारा’ म्हणत अमृता खानविलकरने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली. मराठीसह बॉलीवूडमध्ये तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘चंद्रमुखी’, ‘चोरीचा मामला’ या मराठी चित्रपटांसह तिने ‘सत्यमेव जयते’, ‘राझी’, ‘फूंक’ अशा हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. नुकतंच अमृताने स्वत:चं युट्यूब चॅनेल सुरू केलं. सध्या युट्यूब चॅनेलवर अमृताने ‘तिकीट टू महाराष्ट्र’ ही नवीन सीरिज सुरू केली आहे. या सीरिजच्या माध्यमातून अभिनेत्री राज्यातील नवनवीन ठिकाणांना भेट देते.
हेही वाचा : “मी दारू-सिगारेटला…”, सिद्धार्थ जाधवने केला वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा; म्हणाला…
अमृता तिच्या नव्या ट्रॅव्हल सीरिजमधून महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा, संस्कृती आणि आपल्याकडील निसर्गरम्य जागांचं महत्त्व जगभरातील पर्यटकांना सांगत आहे. या सीरिजचे आतापर्यंत एकूण ५ भाग प्रदर्शित करण्यात आले आहेत. याद्वारे अमृताने प्रेक्षकांना नाशिक, पुणे, कोल्हापूर या शहरांची नव्याने ओळख करून दिली. या सीरिजमधील पुण्याच्या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने कमेंट करत अमृताला ट्रोल केलं होतं.
हेही वाचा : घटस्फोटानंतर झालेल्या ‘गॉसिप’बद्दल सलील कुलकर्णींनी प्रथमच केलं भाष्य; म्हणाले, “ही वृत्ती…”
“काम मिळेना वाटतं आंटीला…”, अशी कमेंट अमृताच्या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने केली होती. या कमेंटवर प्रत्युत्तर देत अमृताने त्या नेटकऱ्याला चांगलंच सुनावलं आहे. अमृता लिहिते, “अहो आजोबा हे कामच आहे…हा प्रवासाशी संबंधित असणारा एक प्रायोजित कार्यक्रम आहे. अच्छा, तुमच्या काळात हे युट्यूब वगैरे नसेल ना? म्हणून तुम्हाला या सोशल मीडियाच्या ताकदिची कल्पना नसेल. हरकत नाही.”
दरम्यान, अमृता खानविलकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अनेकदा अशाप्रकारे प्रत्युत्तर देत ती स्वत:ची बाजू मांडते. लवकरच ती बहुचर्चित ‘कलावती’ चित्रपटात आणि ललिता बाबरच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. हे चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.