ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांनी मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही क्षेत्रात त्या गेल्या कित्येक वर्षांपासून काम करत आहेत. सध्या त्या स्टार प्रवाहच्या ‘कुन्या राजाची गं तू रानी’ या मालिकेत दिसत आहेत. नुकतीच सविता मालपेकर यांनी ‘अमृता फिल्म’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी मनोरंजनसृष्टीतील सुरुवात आणि त्यांना कशाप्रकारे अनेकांनी त्रास दिला याविषयी सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्री सविता मालपेकर यांना या मुलाखतीमध्ये विचारलं की, ‘लक्ष्मी वर्सेस सरस्वती’ ही मालिका का बंद झाली? या प्रश्नाचं उत्तर देताना सविता मालपेकर म्हणाल्या, “स्टार प्रवाहवर ती मालिका होती. कोळ्यांवर आधारित ती मालिका होती. त्यासाठी मी कोळी भाषा शिकायला खूप मेहनत घेतली होती. मी एक महिना खार दांड्याला कोळी भाषा शिकण्यासाठी संध्याकाळी ७ ते रात्री १२पर्यंत माझ्या मैत्रिणीच्या घरी बसत होते. माझी मैत्रीण कोळी होती. एखाद्या मालिका, चित्रपटात विशिष्ट भाषेवर काम करतो तेव्हा जर प्रत्येक वाक्याचा अर्थ मला कळला नाही तर मी माझ्या रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकणार नाही. त्याच्यामुळे मी त्या भूमिकेसाठी मेहनत खूप घेतली होती. भाषा शिकले होते. त्याच्यानंतर कोळ्यांची लग्न, कोळ्यांचे सण कशा पद्धतीने साजरे होतात हे सगळं बघितलं होतं. तसंच ८ दिवस मी सिटी लाईटच्या मार्केटला बसले होते. कारण मासे कापणं, गिऱ्हाईकला कसं बोलवतात, त्यांच्या आवाजाची पातळी काय असते, देहबोली कशी असते, हे समजून घेतलं. मी जर त्यांच्या प्रमाणे करणार नाही तर मी लोकांपर्यंत कोळीन म्हणून पोहोचू शकणार नाही. प्रचंड लोकांना आवडलेली ती मालिका होती. माझी भूमिका खूप हिट झाली होती. पण त्यावेळेच्या स्टार प्रवाहच्या हेडने मला खूप त्रास दिला. आतापर्यंतच्या कारकीर्दमध्ये कोणीही कुठल्याही चॅनेल हेडने आणि निर्मात्यांनी इतका त्रास दिला नव्हता तितका त्रास मला त्या हेडने दिला होता.”

हेही वाचा – Video: स्वानंदी टिकेकरच्या मेहंदी सोहळ्यात आई-वडिलांचा धमाल डान्स, व्हिडीओ व्हायरल

पुढे सविता मालपेकर म्हणाल्या, “सांगायला काही हरकत नाही. मी कोणाला घाबरत नाही. आतमधले अंतर्वस्त्र दिसतील एवढ्या पातळ साड्या मला नेसायला दिल्या. इथूनपासून त्यांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली होती. प्रत्येक वेळेला म्हणायचे, आमच्यामुळे तुम्ही आहात. अरे असं कोणी नसतं कोणामुळे. शेवटी माणूस नियतीने त्याच्या नशीबात काय लिहून ठेवलंय आणि त्याच्या मेहनतीवर तो उभा राहतो. त्याच्यामुळे माझ्यामुळे तुम्ही घडलाय असं काहीही नसतं. सारखा येऊन अपमान करायचे. कुठल्या चॅनेलवर काम करताय माहितीये का? आम्ही आहोत म्हणून वगैरे. पण सुरुवातीला ऐकून घेतलं. किती सहन करणार. एक मर्यादा असते सहन करायची. मी जाडी असल्यामुळे १८ वार साडी नेसायचे. कोळीन मला दररोज साडी नेसवायला यायची. पण मी महिन्याभर नेसवून घेतली, त्यानंतर मी स्वतः शिकले. प्रोडक्शनचे पैसे वाचू दे म्हणून. त्यावेळेस ती कोळीन दिवसाचे सहाशे रुपये घ्यायची. मग मी ते शिकले आणि नेसायला लागले. नंतर माझी सहाय्यक अभिनेत्री माझ्या साड्याचे त्या हेडला फोटो पाठवू लागली. अशाप्रकारे मला त्रास देऊन त्या हेडला काय आनंद मिळत होता, हे आजतागायत कळलं नाही. मला आव्हान केलं होतं, तुला आम्ही मालिकेतून काढून टाकलं तर कोणी इंडस्ट्रीत घेणार नाही. म्हटलं कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. तुम्ही असं म्हणून मला काम मिळणार नाही, हे तर शक्य होणार नाही. नियतीने मला बऱ्याच गोष्टी लिहून वरून पाठवलंय. वडील गेल्यानंतर जगायचं राहिलो नाही आम्ही जगतोयच की. आजही आम्ही पाचही भावंड, आई जगतोय. आज तुम्ही बघताय मी कुठल्या स्टेजला आहे. ही २०१३ची घटना सांगतेय.”

हेही वाचा – हळद लागली…! गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकरच्या हळदीचे फोटो आले समोर

“मी त्या व्यक्तीला सरळं म्हटलं, मी कोणाचा हात वगैरे धरून इंडस्ट्रीत आली नाहीये. माझ्या पाठीशी पुण्याई स्वामींची आणि आई-वडिलांची आहे. तुम्ही कोणाच्या पुण्याईमुळे इंडस्ट्रीत टिकलाय तेवढं फक्त विचार करा. बाकी मला जास्त बोलायचं नाही. मला इंडस्ट्रीने विचारलं नाही, तर वडापावची गाडी लावून जगेन एवढी हिंमत सविता मालपेकरमध्ये आहे. पण हात पसरायला कोणाकडे जाणार नाही. कारण वडिलांनी मला सांगितलं होतं, भांडी घासायला लागली तर चालेल, खूप कष्ट करायला लागेल तरी चालेल पण कोणापुढे हात पसरायचा नाही. माणूस म्हणून आधी चांगली हो त्यानंतर अभिनेत्री म्हणून चांगली होशील. त्यामुळे मी आधी माणूस म्हणून चांगली होण्याचा प्रयत्न केला. आता अभिनेत्री म्हणून चांगली होण्याचा प्रयत्न करत आहे,” अशा सविता मालपेकर म्हणाल्या.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Channel head bothered savita malpekar during laxmi vs saraswati marathi serial pps
Show comments